shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवासा तालुक्यात किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन; विजेत्या विद्यार्थ्यांना पालकांसमवेत ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर – ॲड. पांडुरंग औताडे

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी; स्पर्धेतील विजेत्यांना ऐतिहासिक गड-किल्ल्यांची प्रत्यक्ष भेट

नेवासा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा, या उद्देशाने नेवासा तालुक्यात दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत ऐतिहासिक गड-किल्ल्यांची प्रत्यक्ष सफर घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती अॅड. पांडुरंग औताडे यांनी दिली.


दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि टीव्हीमध्ये वेळ घालवण्याऐवजी पालकांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात. किल्ला तयार करताना त्या गडाचा इतिहास, भौगोलिक रचना, ऐतिहासिक महत्त्व, तेथे झालेल्या लढाया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथांची माहितीही विद्यार्थ्यांनी संकलित करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्पर्धेत नेवासा तालुक्यातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेचा कालावधी 4 नोव्हेंबर 2026 ते 21 नोव्हेंबर 2026 असा आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्याचे जीपीएस लोकेशनसह फोटो आणि संबंधित गड-किल्ल्याची सविस्तर ऐतिहासिक माहिती व्हॉट्सॲपद्वारे आयोजकांकडे पाठवायची आहे. माहिती व फोटो पाठविण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2026 आहे.

या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित ऐतिहासिक गड-किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वराज्याचा इतिहास, गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवरायांच्या पराक्रमाची माहिती प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, तसेच पालकांनी मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सोबत किल्ले तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी अॅड. पांडुरंग औताडे, अनिल विधाटे, ज्ञानेश्वर सांगळे, जालिंदर आरगडे, कमलेश नवले, बाळासाहेब खर्जुले, विकास कोतकर, राजेंद्र कळस्कर, आदित्य विधाटे, सतीश विधाटे, वसंत माळी, दीपक शेजूळ, ईश्वर गव्हाणे, रामेश्वर नवले, अॅड. शेखर गोर्डे, अॅड. प्रवीण काळे, अॅड. प्रमोद टेमक, अॅड. रवी पोटे आणि अॅड. किरण दहातोडे यांच्यासह नेवासा तालुक्यातील गड-किल्ले व शिवप्रेमी नागरिक सहभागी आहेत.

*स्पर्धेसाठी फोटो व गड-किल्ल्याची माहिती पाठविण्याचे संपर्क क्रमांक :

9890273656 | 8483026758 | 7972057505 | 9284460596

*स्पर्धेचा कालावधी : 4 नोव्हेंबर 2026 ते 21 नोव्हेंबर 2026
close