दिवाळीनिमित्त इंदापूर पंचायत समितीत महिला बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
२३ स्टॉलच्या माध्यमातून १ लाख ४५ हजार ४४५ रुपयांची विक्री; महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना नागरिकांची पसंती
इंदापूर, प्रतिनिधी : दिवाळी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पंचायत समिती, इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन इंदापूर पंचायत समितीचे सभापती माननीय हर्षवर्धन मधुकर लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात एकूण २३ स्टॉल उभारण्यात आले होते. दिवसभरात या स्टॉलच्या माध्यमातून एकूण १ लाख ४५ हजार ४४५ रुपयांची विक्रमी विक्री झाली.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविणे तसेच ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम बनविणे या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या उद्घाटनप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पुणे येथील प्रकल्प संचालक संतोष हराळे, पंचायत समितीचे उपसभापती जयकुमार कारंडे, जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, तसेच पंचायत समिती सदस्य श्रीराज दत्तात्रेय भरणे, दिलीप भिसे, विमल किसन काळे, अजित बापू खबाले, विष्णु आबा पाटील, शिवाजी मोहिते व अनिता नंदू सोनवणे, गटविकास अधिकारी सचिन खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी स्वतः तयार केलेले दिवाळी फराळाचे विविध पदार्थ, खाद्यपदार्थ, आकाशकंदील, पणत्या, आकर्षक सजावटीच्या वस्तू, हस्तकला साहित्य तसेच विविध प्रकारच्या घरगुती उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले होते. महिलांनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून तयार केलेल्या उत्पादनांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळाली. अनेक नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी या प्रदर्शनाला भेट देत वस्तूंची खरेदी केली.
या उपक्रमामुळे महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांचे थेट ग्राहकांसमोर सादरीकरण व विक्री करण्याची संधी मिळाली. मध्यस्थांशिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचता आल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. विशेष म्हणजे, प्रदर्शनातून झालेली १ लाख ४५ हजार ४४५ रुपयांची विक्री ही महिला बचत गटांच्या उत्पादनांची गुणवत्ता, मेहनत आणि ग्राहकांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी ठरली.
प्रदर्शनाला पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदी केली. नागरिकांनी दिलेला प्रतिसाद आणि झालेली विक्री यामुळे महिला बचत गटांमधील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, अमोल गलांडे, आदित्य मांधळे, समाधान भोरकडे, चेतन रांजणकर, अमर कदम, सुनीता दातखिळे, निर्मला निमगिरे व तेजस्विनी शिंदे तसेच उमेद अभियानातील ग्रामसखी उपस्थित होत्या.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे या दृष्टीने पंचायत समिती इंदापूरचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. अशा उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला निश्चितच गती मिळणार आहे.

