shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत "

बदलत्या वातावरणानुसार भारताच्या धोरणात बदल होऊ शकतो.

बघता बघता पहिल्या कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उलटी गिणतीही संपत आली आहे. मागील दोन वर्षांपासून दहा संघ आपसात कसोटी सामने खेळले. मग त्यातील भारत व न्यूझिलंड हे अव्वल क्रमांकाचे दोन संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत. आता दोन्ही संघ आपापल्या शस्त्रांना धार लावून तयार आहेत. शुक्रवारी, १८ तारखेला साऊथॅम्प्टन येथील स्टेडियमवर दोन्ही संघ जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील तेंव्हा त्यांची नजर विजेत्यासाठी असलेल्या चमचमत्या (गदा) मेसवर !



दोन्ही संघांनी त्यांच्या मतानुसार आपले सर्वोत्तम १५ खेळाडूंचे अंतिम संघ जाहीर केले आहेत. शेवटचे अकरा खेळाडू काय असतील याचा आपण आपापल्या परीने अंदाज लावत आहोत. भारत पाच फलंदाज, एक यष्टीरक्षक फलंदाज, दोन फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू व तीन निव्वळ जलदगती गोलंदाज अशा सर्वमान्य फॉर्मूल्या प्रमाणे जाईल असा आपला सर्वांचा अंदाज आहे. असेच जर झाले तर रोहीत शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहाणे, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंदन आश्विन, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराहा व ईशांत शर्मा असा भारताचा अंतिम संघ असेल.

                         

परंतु ज्या साऊथॅम्प्टन येथे हा सामना आहे तेथील वातावरण क्रिकेटला पोषक नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार तेथे सामन्याच्या पहिल्या दिवशी ६१ ते ९० टक्के पाऊस होणार आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २५ टक्के तर पाचव्या दिवशी ६२ टक्के पाऊस होऊ शकतो. तिसऱ्या व चौथ्या दिवशी ७० टक्के तसेच राखीव दिवशीही पावसाची भविष्यवाणी वेधशाळेने केली आहे. हा सर्व मामला आयसीसीला ठाऊक असल्याने त्यांनी २३ जुन हा दिवस राखीव ठेवला असून या राखीव दिवशी सामन्याच्या पहिल्या पाच दिवसात जितका वेळ वाया गेला तितकाच वेळ खेळ खेळला जाणार आहे. एवढं सगळं करूनही सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघ संयुक्त विजेते ठरतील असे आयसीसीने पूर्वीच घोषित केले आहे.

पावसाची स्थिती खरोखरच अशी राहीली तर भारताला आपला अंतिम संघ निवडताना काही धोरणात्मक बदल करावा लागेल. कारण ढगाळ वातावरण व पावसामुळे आऊटफिल्ड काहीसं ओलं राहाण्याची शक्यता असून खेळपट्टीही ओलसर राहू शकते. त्यामुळे चेंडूवर फिरकी गोलंदाजांना पकड मिळविणे कठीण जाईल व खेळपट्टीही टणक व फुटीर नसल्याने फिरकी मारा फारसा प्रभावी ठरण्याची शक्यता नसेल. म्हणून या सामन्यात भारत २ फिरकी व ३ जलदगती गोलंदाजांशिवाय न जाता १ फिरकी व ४ जलदगती गोलंदाज असे जाऊ शकतो. असे जर ठरले. तर जडेजा व आश्विन यांच्यापैकी एक जण संघाबाहेर जाऊ शकतो. अशावेळी संघ प्रबंधचा कौल जडेजाच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु आश्विनही जडेजा इतकाच चांगला फलंदाज आहे, शिवाय गोलंदाजीत तो जडेजा पेक्षा सरस आहे. त्यातच न्यूझिलंड संघात डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा जास्त असल्याने व आश्विनची गोलंदाजी डावखुऱ्या फलंदाजांना त्रासदायक सिध्द झाल्याचे अनेकदा सिद्ध झाले असून त्याने कसोटीत आजवर सर्वाधिक २०५ डावखुरे फलंदाज बाद करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. तसेच कसोटीत त्याचे पाच शतकं व ४०० बळी आहेत याचे भान अंतिम संघ निवड करणाऱ्या मंडळींना ठेवावे लागेल. पण भारताने जडेजा व आश्विन या दोघांनाही खेळविले तरी भारतासाठी फायदेशीरच ठरणार आहे.

या परिस्थितित संघात ४ वेगवान गोलंदाज निवडले जातील वरकरणी ते बुमराहा, ईशांत, शमी व सिराज असे असतील. परंतु ईशांतच्या तंदुरुस्तीचा विचार केला तर त्याच्या ऐवजी उमेश यादव असायला हवा. त्याचा वेग व फिटनेस ईंशात पेक्षा कितीतरी पट अधिक आहे. परंतु मी अनेकदा म्हंटल्याप्रमाणे उमेश यादव सरळ सरळ संघात येणार नाही. त्याच्या ऐवजी ईंशातच संघात असेल.

 संपूर्ण सामन्याच्या काळात असेच ढगाळ व पावसाळी वातावरण राहीले तर त्याचा लाभ न्यूझिलंडला होईल. कारण त्यांच्या फलंदाजांना अशा वातावरणात खेळण्याची भारतीय फलंदाजांच्या तुलनेत अधिक सवय आहे. तर दोन्ही संघाचा जलद मारा समतोल असला तरी किवीज गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वरचढ ठरू शकतात. त्यामुळे भारतीय फलंदाजच या संपूर्ण सामन्याचे आकर्षण ठरणार असून त्यांच्या कामगिरीवरच भारताचे विजेतेपद अवलंबून असणार आहे. एवढं सगळं बघता न्यूझिलंड संघ या सामन्यावर वर्चस्व राखण्याचीच शक्यता अधिक आहे.

                             

                         



- : लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

close