shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आम्ही रडलो,झाडे हसली, फुले फुलली, झाडे फुलली..!!

मे महिन्यामधील गोष्ट आहे. नाशिकच्या इंदिरानगर भागात अशोक धर्माधिकारी हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी सहकुटुंब राहतात. त्यांची स्वतःची बाग आहे. या बागेत सुमारे दीडशे छोटी-मोठी फुलझाडे व वृक्ष आहेत.  उन्हाळा-मे महिना यामुळे फुलझाडे फुलत नव्हती आणि कोरोना असल्यामुळे देवाला लागणारी फुले बाजारातून येतच नव्हती. हे दोघेही जेष्ठ नागरिक आपल्या बगीच्यामध्ये बसून चिंतित होते की फुलं नाहीत ! 



आता देवपूजा होणार कशी ? असा विचार अत्यंत गंभीरपणे करता-करता आता त्यांना रडूच कोसळले. त्यांनी बागेतून फेरफटका मारला. काय करावे काही सुचत नव्हते. दुखी अंत:करणाने त्यादिवशी ते तसेच झोपी गेले. रोज बगीच्यात जावे आणि फुलझाडांशी बोलावे, पहावे असा दिनक्रम चालू झाला आणि चारच दिवसात चमत्कार असा झाला. फुलझाडे बहरू लागली.पहिली कळी पाहून दोघंही खूप आनंदले. चार दिवसांत सगळीच फुलझाडे फुलांनी डवरून गेली. 


याचा अर्थ असा निघाला की झाडांना आपल्या भावना/वेदना समजतात. आपण झाडांशी संवाद केला तर झाडे त्याला प्रतिसाद देतात. वृक्ष हे परोपकाराचे प्रतीक आहे म्हणून एखाद्या संस्थेचा करता सवरता स्वर्गवासी झाला तर आपण म्हणतो की त्या संस्थेचा आधारवड निघून गेला. असे महत्त्व हे वृक्ष वेली फळे-फुले यांचे आहे. प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे आणि ती परिसरामध्ये हवेबरोबर हे औषधी गुणधर्म घेऊन फिरते आणि आपल्या सभोवतालचा परिसर निरोगी बनविते.  

यालाच पर्यावरण म्हणायचे. अंगणात, परसामध्ये, गच्चीवर, शेतावर कुठे आपण झाड लावा, वेली लावा, फुलझाडे लावा. त्या बहरतात. कदाचित कधी कधी आपल्याला त्याच्या पाचोळ्याचा त्रास होतो पण तो पाचोळा हा भूमीला सशक्त बनवतो. विशेष सांगायची बाब म्हणजे केवळ घर मालक किंवा ज्यांनी झाडं लावली त्या व्यक्तींशिवाय इतरांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये ती प्राणवायू सोडत असतात. ती कुठेही भेदभाव करत नाहीत. झाडांवर , वेलींवर आलेल्या फुलांचा सुगंध त्याच्या शेजारून जाणाऱ्या माणसाला आपसुक मिळतो. 

खालच्या मजल्यावर गच्चीत कोणी बगीचा केला असेल  तर त्याचं खरं सुख मिळतं ते चौथ्या मजल्यावरच्या रहिवाशांना! तर असे आहे हे परोपकाराचे पर्यावरण. झाडे परोपकार करतात. आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजाला काही देत राहिलो तर त्यातून मिळणारं आत्मसुख, समाधान हे आपल्याला निरोगी आयुष्य देतं. हेच निरोगी पर्यावरणाचं रहस्य आहे


वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 


लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे

संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार

मोबाईल :९८८१३७३५८५


कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत.. पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!!

close