shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्राम पर्यावरण ..

जनजागृती झालीयाविण!

न संपेल गावाचे दैन्य! दृष्टी येता लोकांसि दुर्जन! मेखं घडवू न शकती !! या कार्याशी मिळावी जोड! म्हणुनी हाती घ्यावेत काही मुरदाड !! येणे शक्ती लाभे तोडीस तोड ! पडती फीके ग्रामशत्रु !! 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथात सामाजिक पर्यावरण संतुलनाबाबत अनेक प्रकारचे इलाज मार्गदर्शनपर दिलेले आहेत. ते म्हणतात की गावामध्ये जनजागृती केल्याशिवाय गावाचे दारिद्र्य हटायचे नाही. 



याठिकाणी त्यांनी दारिद्र्य म्हणजे बौद्धिक, मानसिक, आर्थिक या सर्वांचा समावेश केलेला आहे. गावातील प्रामाणिक व्यक्ती ग्राम सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र गावांतील दूर्जन आडबाजूला लपून चांगल्या गोष्टी घडून देत नाहीत.  मात्र जनजागृतीमुळे आपले भले कशात आहे हे जेव्हा लोकांना समजते तेव्हा दुर्जन लोकांना समाज ओळखतो . मग गावामध्ये तंटा बखेडा अशांतता निर्माण करण्याचे त्यांचे उद्देश असफल होतात.  यापुढे ते असे म्हणतात दुर्जनांचा नाश करण्यासाठी प्रसंगी गावातील आडदांड टग्यांनाही सोबत घ्यावे.

या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. जनजागृती करताना गावातील अज्ञानी, अर्धवट, हेकेखोरांना देखील समुपदेशन करून त्यांना ग्राम सुधारणेच्या मोहिमेत सहभागी करून घ्यावे असे यातून ध्वनीत होते. आणि असे झाले की ग्रामशक्तीला खंबीर पाठिंबा मिळतो आणि ग्राम विकासाच्या आड येणारे पराभूत होतात.

आता गावाचा विकास म्हणजे तरी काय?  गावामध्ये भरपूर झाडे असावीत. रस्ते स्वच्छ असावेत. गटारे स्वच्छ असावीत. पाण्याची व्यवस्था शाळेची व्यवस्था, वाचनालये मैदाने, बाग-बगीचे, तलाव, विहिरी याने समृद्ध असेल ते आदर्श गाव. या गावातील माणसे देखील स्वच्छ विचाराची असावी लागतात तेव्हा गावाचा विकास होतो. अशाप्रकारे गावाचे पर्यावरण संतुलन झाले की गावात कधीही तंटा बखेडा होत नाही. गाव प्रगतीपथावर जाते. अशाप्रकारे सर्वच गावे प्रगतीपथावर गेली की तालुका आदर्श होतो. तालुका, जिल्हा व पुढे आपला देश प्रगतिपथावर जातो. हे सर्व केवळ गावातील पर्यावरणीय संतुलनाने साध्य होते.


वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 


लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे

संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार

मोबाईल क्रमांक:९८८१३७३५८५.


कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..

पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबर २०२१  असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

close