प्रतिनिधी :आसावरी वायकर
शेवगाव : (दि .१८) :जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची मुले खाजगी शाळांत शिक्षण घेतात, असा समाजातून अनेकदा सूर उमटतो. परंतु, शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्लिश प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक गणेश पुरूषोत्तम यांच्यासह तीन शिक्षकांनी आपली स्वतःची मुले स्वतः अध्यापक करत असलेल्या हातगाव जि.प. प्राथमिक शाळेत दाखल केली.
सध्या कोविडमुळे शाळा बंद असल्यातरी मंगळवार ( दि. १५ पासून ) सर्व्हेक्षणानुसार पटनोंदणी करणे, ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व खाजगी शाळांतील शिक्षकांनी सुरू केले आहे.
हातगाव जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी गावात गटा - गटाने फिरून पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांची नावनोंदणी केली. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प व खाऊ देऊन केले. हातगाव शाळेचे मुख्याध्यापक गणेश पुरूषोत्तम यांनी त्यांची कन्या खुशीला तिसरीत दाखल केले. तर प्राथमिक शिक्षक विष्णू वाघमारे यांनी त्यांचा मुलगा विपूल याला तर प्रा. शिक्षक बाबासाहेब लहासे यांनी कन्या सानवी हीस पहिलीत दाखल केले. त्यांचे गुलाबपुष्प व खाऊ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले.
पटनोंदणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आजिनाथ अभंग, मुख्याध्यापक पुरूषोत्तम, अरूण घोरपडे, एकनाथ घुगे, बाळासाहेब वाघुंबरे, रेश्मा धस, मनिषा हरेल, वाघमारे, लहासे, सुंदर सोळंके, संजय भालेकर आदींनी परिश्रम घेतले.
स्वतः शिक्षक असलेल्या जि.प. शाळेत मुलांना दाखल करणा-या प्राथमिक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी रामनाथजी कराड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ मॅडम, केंद्रप्रमुख अशोकराव कचरे साहेब आदींनी अभिनंदन केले.