महाराष्ट्रातील ८५०० कृषी सहाय्यकांना प्रत्येकी दहा वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे असे वृत्त नुकतेच प्राप्त झाले.
.
या बंधार्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडविले जाईल व डोंगरात, मातीत जिरविले जाईल असा तर्क आहे. शासनाची योजना नक्कीच चांगली आहे तथापि हे नक्की साध्य होऊ शकते काय याचे चिंतन शासनाने करावे.
कारण असे आहे की गेल्या अनेक वर्षापासून ठीक ठिकाणी रुजलेली झाडे ही भूगर्भातील पाणी वाढविणारी नाहीत तर हवेतील पाणी सुकविणारी आहेत हे वास्तव आहे. डोंगरात उंबर, जांभूळ, वड, पिंपळ अथवा तत्सम देशी औषधी वृक्षांचे प्रमाण नगण्य उरलेले आहे. निलगिरी व अन्य विदेशी झाडांची राने आहेत, जी गारवा निर्माण करीत नाहीत. त्यांच्या सावलीत शुष्कता असते. त्यामुळे केवळ बंधारे बांधून काम होणार नाही. तर पाणी सुकवणाऱ्या वनस्पती या मुळापासून हटवायला लागतील व वातावरणात गारवा निर्माण करणाऱ्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करावी लागेल. देशी वृक्षराईमुळे डोंगरात पाणी निर्माण होते. ही दोन्ही कामे एकाच वेळेला झाली तर निश्चितच पूर्वी ५० वर्षांपूर्वी जसे डोंगरातून वर्षभर पाण्याचे झरे दिसायचे, गावोगावी पाणवठे, डोह दिसायचे तसे आपोआप तयार होतील. यासाठी शासन विदेशी वृक्ष नष्ट करण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकेल काय हा मोठा चिंतनाचा प्रश्न आहे.
वन्यप्राणी,पक्षी व जलचक्रास मारक ठरणाऱ्या विदेशी वनस्पतींची वाढ थांबवण्याबाबत कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल. पर्यावरण रक्षणासाठी हे अत्यावश्यक आहे.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५