श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक कारखान्याचा गळीत हंगाम संपला असून ऊस तोडणी मजूर त्यांचे गावाकडे दोन दिवसात परतणार आहेत.त्यांना मदत म्हणून श्रीरामपूरकरांनी वापरात नसलेले जुने कपडे द्यावेत, असे आवाहन माजी आ.भानुदास मुरकुटे तसेच लोकसेवा आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकसेवा विकास आघाडीच्यवतीने प्रसिध्दीस दिलेल्या पञकाव्दारे सदरचे आवाहन करण्यात आले आहे. अशोक कारखान्याचा गळीत हंगाम संपत असून ऊस तोडणी मजूर त्यांचे गावाकडे परतणार आहेत. ऊस तोडणी मजूर गोरगरीब असून काबाडकष्ट करणारे आहेत, ते अत्यंत हालाकीचे जीवन जगतात.
अशा कष्टकरी मजुरांना वापरात नसलेले जुने कपडे देण्याचे लोकसेवा विकास आघाडीने ठरविले आहे. तरी शहरातील नागरिकांनी सदरच्या आवाहनास प्रतिसाद देवून वापरात नसलेले जुने कपडे लोकसेवा विकास आघाडीच्या प्रतिनिधींकडे जमा करावेत. जमा झालेले कपडे ऊस तोडणी मजुरांना देण्यात येतील.
यासाठी आज शुक्रवार (ता.१७ मार्च) रोजी लोकसेवा विकास आघाडीचे प्रतिनिधी शहरात विभागनिहाय नेमण्यात येणार आहेत. तरी सिंधी काॕलनी (गुरुव्दारा जवळ), लबडे वस्ती (दक्षिणमुखी हनुमान मंदिर), मोरगे वस्ती (हनुमान मंदिर), कामगार हाॕस्पीटल परिसर (देवीचे मंदिर), उत्सव मंगल कार्यालय (साई मंदिर), मेनरोड परिसर (श्रीराम मदिर) या ठिकाणी कपडे जमा करावेत, असे आवाहन युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष नाना पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष रोहन डावखर, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे आदिंनी केले आहे.

