शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
मुकुंदराव सिनगर यांची सहकारातील वाटचाल अभिनंदनीय - विवेक कोल्हे
-भोजडे येथे आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा -
कोपरगाव तालुक्यातील मौजे भोजडे येथील भोजडे नं २ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, भोजडे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज सरला बेटाशी निगडित डवाळा येथील श्री नारायणगिरी महाराज आश्रमातील ह.भ.प. भरत महाराज यांच्या शुभ हस्ते संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तर प्रमुख अतिथी जिल्हा बँकेचे संचालक मा.विवेक कोल्हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी मा.अविनाश काटे साहेब उपस्थित होते. यावेळी संस्थेचा आलेख व कामकाज बघून मी गेल्या 2009 पासून भोजडे गावचा धार्मिक व राजकीय एकोपा पाहत आलो असून भोजडे नं 2 संस्थेने सचोटीने सहकार जपल्याचे गौरोदगार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काढले तर संस्थेचे चेअरमन मुकुंदराव सिनगर यांची सहकारातील वाटचाल अभिनंदनीय असल्याचे मत जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव तालुक्याचे युवानेते मा. विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोसायटीच्या माध्यमातून कै.सिताराम व्यंकटराव पा. सिनगर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येक वर्षी एक आदर्श सभासद म्हणून पुरस्कार देण्यात येत असतो. हे पुरस्काराचे अकरावे वर्ष असून यावर्षीचा आदर्श सभासद पुरस्कार ह.भ.प. भरत महाराज आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते श्री. अशोक रामजी मंचरे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचेक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 1111 मात्र देण्यात आली. यावेळी नेहमीप्रमाणे भोजडे गावाने खेळीमेळीत वार्षिक सर्वसाधारण सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करत सहकार क्षेत्रात आपला एकोपा दर्शवीला.
यावेळी ह.भ.प.भरत महाराज यांनी संस्थेच्या संचालक मंडळास भरभरून आशीर्वाद देत आपल्या हातून समाजसेवेच्या माध्यमातून खरी ईश्वरसेवा घडत असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात चेअरमन मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की, सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जाचक अटी आणि सरकारचा सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन यामुळे संस्था अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असून मंचावरील दोन्हीही भावी खासदार आणि भावी आमदार यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालणे अपेक्षित आहे. जिल्ह्य बँकेने सर्व सोसायटी काम्पुट्राईज करून सचिवांना बँकेच्या सेवेत सामावून घेतले तर सर्व संस्था भक्कम होतील. आज ज्या मातीत जन्माला आलो आणि ज्या पंचक्रोशीने आपल्याला उत्तम संस्कार दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थापक चेअरमन कै. सिताराम सिनगर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रथम स्पष्ट केले. यावेळी बाहुबली पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी ठाकरे, कृषिभूषण बाळासाहेब निकम, जेष्ठ मार्गदर्शक शहाराम सिनगर यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले.
यावेळी प्रमुख अतिथीमध्ये शिवसेनेचे नेते अशोक मामा थोरे, दत्ता पाटील कडू, नानासाहेब पा. सिनगर, संभाजी पा. सिनगर, रंगनाथ नाना पा. सिनगर, भाऊसाहेब पा. सिनगर, उपसरपंच दिलीप देवराम पा. सिनगर, अनंत जयराम पा. सिनगर, ज्ञानेश्वर बाबुराव पा. सिनगर, संजय रंगनाथ पा. सिनगर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सागर करडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शंकर सिनगर यांनी मानले. यावेळी सोसायटीचे व्हा. चेअरमन दिनकर बाबासाहेब सिनगर समवेत संचालक रावसाहेब सिनगर , ज्ञानेश्वर सिनगर ,रामनाथ चंदणे, फकीरचंद जेऊघाले, दीपक धट, अशोक मंचरे, कुंडलिक घुले, विजय सिनगर, बळीराम सिनगर, राजेंद्र घणघाव, भीमजी शिंदे, सचिव श्री. गणेश बारहाते, मदतनीस श्री. मधुकर सिनगर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी, सभासद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.