अहमदनगर:- जिल्हा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, प्रजा रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. यावेळी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, सरकारने मुक्त परवाना धोरण बंद करून नवीन परवाने देणे तत्काळ बंद करावे, पंधरा वर्षे झालेल्या जुन्या रिक्षा, टॅक्सी तत्काळ स्क्रॅप करण्यात यावे, विनापरवाना जुन्या ऑटो रिक्षा यातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक तत्काळ बंद करावी, वाहतूक पावतीची रक्कम पूर्वीसारखी करावी, ऑनलाइन पावत्या बंद कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माळीवाडा, कापड बाजार, चितळे रोड, दिल्ली गेट, पत्रकार चौक, तारापूर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रिक्षा बंद असल्याने शहरातील नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या मोर्चाप्रसंगी आमदार संग्राम जगताप, प्राध्यापक माणिक विधाते, जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सल्लागार कॉम्रेड बाबा आरगडे, कामगार नेते नितीन पवार, दत्ता वामन, अशोक औशीकर, विलास कराळे आदी उपस्थित होते.