तेरावी विश्वचषक स्पर्धा पाच ऑक्टोबरला सुरू झाली आणि पहिल्या दिवसापासूनच आश्चर्याचे धक्के बसायला लागले. सलामीचा सामना सन २०१९ च्या स्पर्धेतील विजेते इंग्लंड व उपविजेते न्युझिलंड यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. इंग्लंड गतविजेते असल्याने त्यांच्या विजयाची आस अनेक जण धरून बसले होते. परंतु त्या स्पर्धेत न्युझिलंडकडून अन्यायकारकरित्या विजेतेपद हिरावल्याची धग त्यांच्या मनात होती. ती आग न्युझिलंडच्या खेळाडूंनी सर्वच क्षेत्रात सरस कामगिरी करून इंग्लंडला चोहोबाजूनी घेरले व एक साधा, सोपा व सरळ विजय मिळवून स्वतःच्या सक्रिय अस्तित्वाची जाणीव सर्वच सहभागी संघाना करून देताना आम्हीही स्पर्धा जिंकण्यासाठी आलो आहोत असा सज्जड दम वजा इशाराच दिला.
या दरम्यान अनेक रोमहर्षक व विक्रमी चमत्कार घडविणारे सामने झाले त्यामुळे प्रेक्षकांनाही आनंदाचा आस्वाद घेता आला व जुने विकम इतिहास जमा होताना नवीन विक्रमी आस्तित्वात आले. द. आक्रिकेने दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरूध्द विक्रमांचा जणू सडाच घातला. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रचली. एकाच डावात तीन फलंदाजांनी शतके झळकविण्याचा पराक्रमही येथेच घडला. विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकही येथेच आले. त्यानंतर श्रीलंकन फलंदाजांनीही धावांचे रतिब घातले. परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडल्याने धावांचा पाठलाग करताना मिळणारा मोठा विजय थांबला. त्यामुळे आणखी एक विश्वविक्रम जगासमोर आला नाही.
याच अरूण जेटली स्टेडियमवर भारताचा सामना अफगाणिस्तानबरोबर झाला. प्रथम फलंदाजी करून अफगाणी संघाने २७३ धावा कुटल्या मात्र प्रत्युत्तरात भारताने पस्तीस षटकातच अफगाणिस्तानचे आव्हान परतविले. त्यानंतर याच मैदानावर अफगाणिस्तानची लढत रविवारी विद्यमान वनडे व टिट्वेंटीच्या विश्वविजेत्या इंग्लंड विरूद्ध झाली. धावांचा खजिना असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडची मजबूत फलंदाजी बघता या सामन्यातही धावांचा महापूर येईल असे अनेकांना वाटत होते आणि तसे वाटणे गैरही नव्हते. कारण अफगाणिस्तान संघ इंग्लंडच्या तुलनेत दुबळा व बऱ्याच गोष्टीत कागदोपत्री डावा दिसत होता. शिवाय
इंग्लंड सध्या वापरत असलेल्या बॅजबॉल फॉर्म्यूल्यामुळे ते धावांचा अंबार उभा करतील असे चित्र निर्माण झाले होते. त्यातच इंग्लिश कर्णधार जोश बटबरला नाणेफेक जिंकल्यामळे प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या रचण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. मात्र ती त्यांनी स्वतःहून नाकारली व एका नाटयमय सामन्याला जणू खतपाणीच घातलं.
असं इंग्लंडने नेमकं का केलं हे अनेक तज्ञांच्या आकलन शक्तीच्या पलिकडचे होते. अफगाणिस्तानी फलंदाजांनी डावाची शतकी सलामी देऊन भक्कम पायाभरणी केली, परंतु मधल्या षटकांत त्यांची सामन्यावरील पकड निसटली होती. मात्र शेवटी राशीद व मुजिबने डावाची पुन्हा एकदा डागडुजी केली व २८४ धावा फलकावर लावल्या मात्र निर्धारीत षटके पूर्ण होण्या आधीच एक चेंडू पहिले त्यांचा डाव संपला.
फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी असा या खेळपट्टीचा लौकिक असल्याने इंग्लिश फलंदाज निश्चिंत म्हणण्यापेक्षा जास्त बेफिकीर असल्याचेच दिसत होते. त्यातच अफगाणि गोलंदाजांना कमी समजण्याची व खेळपट्टीचा रागरंग ओळखण्याची मोठी गल्लत इंग्लंडकडून झाली. त्याचा मोठा घाटा इंग्लंडला या सामन्यातील अनपेक्षित पराभवाच्या धक्याने झाला.
अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना इंग्लंडचे सुरुवातीलाच कंबरडे मोडले त्यानंतर त्यांचे तीनही फिरकी गोलंदाज राशिद, नबी, मुजिब यांनी खेळपट्टी फिरकीच्या प्रेमात पडल्याचे दिसताच इंग्लिश फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढले. हे सगळं घडत असताना इंग्रजांना त्यांच्या अस्तित्वाला कधी हादरा बसला हे कळलेच नाही. इंग्लिश संघ कधीही या सामन्यात अफगाणिस्तानला टक्कर देतोय व विजयाच्या जवळ जातोय असे वाटलेच नाही. एकटा हॅरी ब्रुक सोडला तरी त्यांच्या कोणत्याही फलंदाजाने प्रतिकार केलाच नाही एकोण सत्तर धावांचा मोठा पद पराभव त्यांच्या पदरी पडला.
अफगाण संघाचा सलामीवीर गुरजाब, मधल्या फळीतील फलंदाज इक्राम,राशिद खान, मुजिब यांनी फलंदाजीत उठावदार खेळ केला. इंग्लिश गोलंदाज मात्र यांना रोखण्यात कमी पडल्याने इंग्लंडच्याच अडचणीत वाढ झाली. थोडक्यात असा निष्कर्ष निघू शकतो की इंग्लंडची प्रतिपक्षाला कमी लेखण्याची जुनी सवय महागात पडली आहे. कारण इंग्लंडला प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या कमजोर संघांनी हरविले आहे. तरीही त्यांच्या स्वभावात बदल व्हायचे काहीही लक्षणं दिसत नाही. तीन सामन्यात दोन पराभव झाल्यामुळे इंग्लंडचे गुणतालिकेतील स्थान खाली सरकले आहे. त्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशांना सुरूंग जरी लागला असला तरी त्यांचे अजून सहा सामने बाकी असल्याने ते त्यावर योग्य ते काम करू शकतात. मात्र सलग चौदा विश्वचषक पराभव स्विकारलेल्या अफगाणिस्तानने थेट विश्वविजेत्यांनाच चिरडून आपले विजय अभियान सुरू केले. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमततुल्ला शाहिदी टि२० चा विश्वविजेता इंग्लिश कर्णधार जोश बटलरच्या तुलनेत कितीतरी पट उजवा ठरला.
अफगाणिस्तानला जर सेमीफायनल मध्ये जायचे असेल तर त्यांचा मार्ग सोपा नाही मात्र हिच विजीगुषी वृत्ती त्यांना स्वप्नांच्या नगरीत घेऊन जाऊ शकते.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

