सातारा : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेलेल्या रयत शिक्षण संस्थेचा १०४ वा वर्धापन दिन समारंभ बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कर्मवीर समाधी परिसर,सातारा येथे आयोजित केला आहे. संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक मा.डॉ.राजेंद्र जगदाळे हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे व संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या वर्धापनदिन समारंभाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात ज्या थोर व्यक्तींनी भरीव योगदान दिले त्या व्यक्तींचे स्मरण रहावे या हेतूने संस्थेच्या सर्व विभागातील आदर्श विद्यार्थी ,आदर्श विद्यार्थिनी ,आदर्श विज्ञान शिक्षक ,उपक्रमशील शिक्षक ,कार्यक्षम गुरुकुल प्रमुख ,व उपक्रमशील शाळा यांना प्रमुख पाहुणे डॉ.राजेंद्र जगदाळे यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
तरी या समारंभास सातारा शहरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे.

