shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहित शर्माची अफगाणिस्तानवर हॅपी मेडिकेअर थेरपी


         दक्षिण कोरियामधील एक समाजसेवी संस्था सुरुवातीला स्थानिक लोकांसाठी आरोग्यवर्धक जर्मेनियम थेरेपी करून शारिरीक तंदुरुस्ती देण्याचा मोफत उपचार करते. हि उपचारपध्दती यशस्वी झाल्याने संपूर्ण जगभर त्यांनी हि समाजोपयोगी पध्दत विनामूल्य सुरू केली. आता शंभरावर देशातील लोक या जर्मेनियम थेरेपीचा मोफत उपचार करून आपले आयुष्य सर्वांगसुंदर करत आहेत. अगदी असाच उपचार टिम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तान क्रिकेट संघावर दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर बुधवारी रात्री केला.

           तेराव्या विश्वचषक स्पर्धेत भारत आपला दुसरा सामना आफगाणिस्तानसोबत खेळला. आपल्या सलामीच्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलियाला भले पराभूत केले, मात्र भारताचे तीन प्रमुख फलंदाज कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन व श्रेयस अय्यर शुन्याचे धनी बनले होते. त्यानंतर विराट कोहली व लोकेश राहुलने संघाचा मोर्चा सांभाळून भारताचा विजयी रथ ईप्सित स्थळी नेला.
             याच पार्श्वभूमीवर भारत अफगाणिस्तान सोबत खेळण्यास मैदानात उतरला. नाणेफेकीचा कौल पाहुण्या संघाच्या बाजूने लागल्याने त्यांनी प्रथम फलंदाजी निवडून फलंदाजीला धार्जिण्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या रचून भारताला कोपऱ्यात खेचण्याची चाल रचली. त्यांची हि चाल काहिशी यशस्वीही ठरली मात्र भारतीय गोलंदाजांनी खास करून जसप्रित बुमराहाने त्यांच्या डावाला खिंडार पाडून लगाम घातला. त्याला इतर गोलंदाजांनीही बऱ्यापैकी साथ दिल्याने धावांची गंगाजळी असलेल्या अरूण जेटली स्टेडियमवर आफगाणिस्तानला तिनशेच्यावर जाता आले नाही.
               तिनशे त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यास रोहित शर्मा व ईशान किशन जोडी मैदानात एक वेगळाच विचार मैदानात उतरली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच अगदी प्रेमाने आफगाणी गोलंदाजावर आपली हॅपी थेरेपी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मैदानातीला प्रेक्षकही हॅपी बनले. आपल्या भात्यातील सर्व शस्त्रांचा वापर करून रोहितने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यावेळी त्याचा साथीदार ईशान किशन भर मैदानाला दर्शक बनला होता. म्हणतात ना, टरबूजाने रंग दाखवायला सुरुवात केल्यानंतर खरबूजही आपले रंग उधळायला सुरुवात करते. अगदी तसाच प्रकार येथे घडला. रोहितच्या झंझावातात आफगाण गोलंदाजांची वाताहत होत असताना किशन थंड होता. मात्र नंतर त्यानेही प्रतिबॉल धावा करून दिडशतकी भागीदारी करून सचेचाळीस धावांचे योगदान देत पॅव्हेलियनचा मार्ग निवडला.
               या दरम्यान टिम इंडिया व समस्त क्रिकेट शौकिनांना आनंदी करण्याची हॅपी मेडिकेअर थेरेपी रोहित शर्माने करताना त्यात आफगाणी खेळाडूंनाही आनंदी केले. रोहितने धावांच्या वर्षावात विक्रमांचाही सडा घातला. प्रथम सर्वात कमी सामन्यात (१९) हजारी गाठली. आजतागायत वनडे सामन्यात (५५६) षटकार ठोकून जगातला महान षटकारवीर ठरला. अवघ्या तिसऱ्याच विश्वचषकात विक्रमी सातवे शतक ठोकून वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज बनला. याच दरम्यान विश्वचषकात सर्वात जलद शतक ठोकण्याचा कपिलदेव यांचा झिंबाब्वे विरूध्द केलेला पराक्रम मागे टाकला. रोहितच्या या हॅप्पी थेरेपीने भारताची धावगती वधारली व गुण तक्त्यात थेट दुसऱ्या स्थानी धडक मारली. रोहितची वादळी १३१ धावांची खेळी राशिद खानने संपवली. तो पर्यंत भारताचा विजय निश्चित झाला होता.
               रोहितच्या पतनानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा शुन्याधीश श्रेयस अय्यर फलंदाजीस आला. यावेळी त्याने कोणताही आततायीपणा न करता संघाच्या संकटात भर न टाकता विराट कोहलीसह विजयी होऊनच मैदान सोडले.
                 मात्र सगळ्या धामधुमीत विराट कोहली कुठेही मागे नव्हता. त्याची बॅट तळपत होतीच, यावेळी नाबाद पंचावन्न धावांची खेळी साकारताना त्यानेही आफगाण संघावर हॅपी मेडिकेअर थेरेपी अक्षरश:केली. मागच्या आयपीएल सत्रात आरसीबी कडून खेळताना विराट कोहलीची लखनौ जायटंसचा खेळाडू अफगाणिस्तानचा नविन उल हक याच्या सोबत मोठी झडप उडाली होती. त्याचे पडसाद समस्त क्रिकेट जगतात उमटले होते. त्यामुळे नविन सोबत कोहलीची नाचक्की झाली होती. मात्र या सामन्यात हे दोन्ही खेळाडू खेळत होते. कोहली फलंदाजी करत असताना नविन उल हकला काय उपरती झाली देव जाणो ? त्याने थेट कोहलीची गळाभेट घेतली, हस्तांदोलन केले व गतकाळात घडलेल्या चुकांची दुरुस्ती करत मैत्रीचा हात पुढे केला. भारताची या सामन्यातील सदृढ परिस्थिती असल्याने कोहलीही आनंदी होता. मग त्यानेही नविनच्या प्रस्तावास दिलखुलासपणे साथ देत स्टेडियम मधील प्रेक्षक व टिव्हीवर सामन्याचा आनंद घेणाऱ्या रसिकांना सुखद धक्का देत त्या दोघांतील वादाला पुर्णविराम दिला. या तऱ्हेने रोहितने सुरू केलेली हॅपी मेडिकेअर थेरेपी कोहलीनेही पुढे सुरू केल्याने आफगाण संघाबरोबरच संपूर्ण क्रिडा जगत हॅपी झालं.
                भारताने पंधरा षटके व आठ गडी राखून मोठा विजय मिळवत येत्या चौदा तारखेला अहमदाबादला पांरपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूध्द खेळण्यापूर्वी आपण सर्वच प्रकारच्या लढाईसाठी सज्ज असल्याचा पाकला जणू इशाराच दिला आहे.

लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close