*अविनाश आदिक यांना विधान
*परिषदेवर घेण्याची एकमुखी मागणी
*महायुतीच्यावतीने आभार सभेत*
*कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना*
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांना मत विभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने व अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक यांना विधानसभेवर घेण्यात यावे, अशी एकमुखी मागणी अनेक वक्त्यांनी यावेळी केली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी आज काँग्रेस भवन येथील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात महायुतीच्यावतीने विचारविनिमय करण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, ज्येष्ठ नेते अजित कदम, अमृत काका धुमाळ, जि. प.चे माजी सभापती शरद नवले, बाळासाहेब तोरणे, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, मुक्तार शहा, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, बाबासाहेब खोसरे, सलीम शेख, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, अनिता ढोकणे, वेनुनाथ कोतकर आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. अजून आपली जागा मिळाली असती तर श्रीरामपूरचे चित्र बदलले असते. आता पुन्हा ५ वर्ष तालुका बाजूला पडणार आहे. आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. काम करूनही त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. असे असले तरी श्रीरामपूरचे प्रश्न चौथ्या क्रमांकावर असणारेच सोडविणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामपूरसाठी ३ हजार कोटी रुपये निधी देण्याचे शब्द दिला आहे. आगामी काळात तो निधी आणून विकासकामे करू, नवीन आमदाराने मागणी केल्यास त्यांनाही मदत करू, पराभवाने खचून न जाता संघटना वाढीसाठी प्रयत्न करू असे अविनाश आदिक यावेळी म्हणाले.
अशोक कानडे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आले ही आपली जमेची बाजू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नासाठी हतबल होण्याचे कारण नाही. सहकाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, संघटना ही आपली मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उभे राहून आपली ताकद दाखवून देऊ. अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेवून अजित पवार निश्चितपणे न्याय देतील, त्यामुळे कोणीही खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत `गड आला पण सिंह गेला` अशी स्थिती निर्माण झाली असली तरी राज्यात महायुतीचे सरकार आल्याने कोणतीही अडचण येणार नाही. स्व. गोविंदराव आदिक यांनी तालुक्याचे विकासाचे स्वप्न पाहिले तीच दूरदृष्टी ठेवून आ. कानडे यांनी मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली. परंतु काहींनी महायुतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अविनाश आदिक यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले. आगामी निवडणुकीतही एकत्रपणे काम करून पराभवाचा वचपा काढू, असे अरुण नाईक यावेळी म्हणाले.
दहा वर्षानंतर आ. कानडे यांच्या रूपाने मतदारसंघासाठी प्रतिभासंपन्न उमेदवार मिळाला होता. प्रशासकीय कामाच्या अनुभवामुळे अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. वातावरण चांगले होते. विजयाची खात्री होती. मात्र शेवटच्या दोन दिवसात वातावरण बिघडून आत्मघात झाला. असे असले तरी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विकासात कुठलाही खंड पडणार नाही. आगामी काळात पक्ष संघटना वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा, असे आवाहन अजित कदम यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, शरद नवले, अमृत काका धुमाळ, कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, विष्णुपंत खंडागळे, बाबासाहेब कोळसे, रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रिभुवन, निलेश भालेराव, प्रा. कार्लस साठे, भागचंद औताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, देवा कोकणे यांची यावेळी भाषणे झाली. तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे यांनी आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, युवक प्रदेश सरचिटणीस फारुक पटेल, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, सागर मुठे, शिवाजी पवार, रमेश आव्हाड, राजेंद्र ओताडे, मदन हाडके, अमोल आदिक, हरिभाऊ बनसोडे, युनुस पटेल, चंद्रसेन लांडे, प्रा. एकनाथ ढोणे, तुकाराम चिंधे, राजेंद्र कोकणे, आबा पवार, नानासाहेब रेवाळे, सुरेश पवार, अजिंक्य उंडे, दिपक कदम, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब ढोणे, अण्णासाहेब वडीतके, सुमित मुथ्था, सारंगधर पवार, अक्षय नाईक, रवी राजुळे, मधुकर ठोंबरे, भाजपचे प्रफुल्ल डावरे, मुश्ताक शेख, दादासाहेब कुताळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*चौकट*
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे यांनी यावेळी अविनाश आदिक यांना विधानपरिषदेवर घ्यावे, या मागणीचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात साथ दिली. त्यानंतर अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून अविनाश आदिक यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी केली. अरुण नाईक यांनी, राज्यात महायुतीचे सरकार आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला, उपस्थितांनी टाळ्या वाजवून या ठरावास संमती दिली. विधिमंडळ पक्षनेते पदाच्या निवडीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावून घेतल्याने माजी आमदार लहू कानडे मुंबईला गेले असल्याची माहिती श्री. आदिक यांनी यावेळी दिली.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111