shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला दिन : एकल महिलांचे भावनिक एकटेपण...ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.


आज महिला दिनी मला एकल महिलांचे भावनिक एकटेपण लक्षात आणून द्यावेसे वाटते....

विधवा महिलांसाठी काम करताना एक वेगळाच मुद्दा लक्षात आला. त्यांचे आयुष्यभर असणारे भावनिक एकटेपण यावर फारशी चर्चा होत नाही. ग्रामीण भागात साधारणतः १५ वर्षी मुलीचे लग्न होते व लगेच मुले होतात. ती २५ व्या वर्षी तरुण वयात विधवा झाली तर मुले ७/८ वर्षांची असतात. त्यामुळे आता मुले मोठी आहेत. कशाला लग्न करतेस ? म्हणून तिच्या लग्न करण्याला  विरोध होतो.आणि इतक्या लहान वयात दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर असते...या वयात शहरातल्या मुली लग्न ही करत नाहीत आणि या महिलांचे या वयात सगळे संपलेले असते..

ती चाळीस वर्षांची होते तेव्हा मुलांचे वय २० पेक्षा जास्त असते.मुलीचे लग्न लवकर करून टाकते व मुलाचेही लग्न होते. मुले वाढवताना तरी ती सतत कामात असते,मुले वाढवायची या  स्वप्नाने दुःख एकटेपण किमान विसरले जाते पण एकदा मुलाचे आणि मुलीचे लग्न झाले की तिच्या  भावनिक एकटेपणाची भावना अधिकच गहिरी होते..

 मुलगी सासरी असते. अधूनमधून फोन करते व मुलगा फक्त कामापुरते बोलतो. पाहिजे ती वस्तू आणून देतो. सून चांगली मिळाली तर ठीक अन्यथा दुःख अधिकच वाढते. जेवण वस्तू जागेवर मिळतात पण घरात बोलायला कोणीच नसते.

 एकटेपणा अधिकच वाढत जातो. ती ही तरुण असतानाच तिच्या  तरुण मुलाचा नवीन संसार  सुरू असतो.  त्याचा संसार शृंगार सगळे ती बघत असते आणि नकळत तिच्या मागच्या आयुष्याच्या आठवणी जाग्या होतात. आजूबाजूच्या घराघरात चालणारे सुखी संसार बघून तिची विषण्णता अधिकच गहिरी होते...मग ती फक्त धार्मिक गोष्टीत मन रमवते..वय वाढत जाते...एकटेपण वाढत जाते.

 शहरी भागात करिअर करणाऱ्या महिला असतील तर एकटेपणा त्या त्यांच्या छंद व्यवसाय उद्योग यात रुपांतरित करतात त्यातून एकटेपणा काहीसा झाकला जातो. ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या लग्नानंतर चाळीशी ओलांडलेल्या कमी शिकलेल्या या विधवा शेती मजुरी आणि घर यात काय करणार ?  दुःख अधिकच गहिरे होते. लहानपणापासून तिला वाढवताना छंद  विकसित केलेले नसतात कोणतेही विशेष कौशल्य शिकवलेली नसतात. अशावेळी यंत्रवत जीवन जगणे इतकाच पर्याय उरतो..दिवस खायला उठतो.खेड्यात रोज काहीच वेगळे घडत नाही की बोलायला कोणीच नाही..

 नवऱ्यासोबत काढलेली वर्षे आठ किंवा दहा वर्षाचे असतात आणि  त्याच्याशिवाय पन्नास वर्ष आयुष्य काढायचे असते..

 विधवा महिलांच्या भावनिक एकटेपणा हा मला शोक काव्याचा विषय वाटतो....
close