shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नदीची मुलं..,कोळस ..आणि कवडस..!

नदीची मुलं
कोळस ..आणि कवडस
       पांढऱ्या शुभ्र रंगाचे. चमचम करणारे खवले असणारे मासे.नदीतून बाहेर काढल्यावर असे वाटते की चांदीच बाहेर निघाली आहे.बाहेर काढल्या नंतर कितीतरी वेळ हा पांढरा शुभ्र रंग मनाला मोहवत राहतो.कवडस हा भीमा नदी आणि तिच्या उप नद्यांमध्ये विपुल प्रमाणात सापडणारा मासा.पूर्ण वाढ झालेला मासा पावशेर ते अर्धा किलो साईजचा .पावसाळ्याच्या सुरुवातीला अंड्यावर येतो.तो शाकाहारी असल्यामुळे गळाला लागत नाही.परंतु जाळ्यात मोठया प्रमाणावर सापडतो.त्याला प्रचंड काटे असल्यामुळे मागणी कमी आहे.म्हणून किंमतही कमी.आजमितीस आजूबाजूच्या बाजारात ऐंशी रुपये किलो प्रमाणे विकला जातो.

सामान्य ग्राहकांना या माशाचे नाव माहीत नसल्याने सर्वजण त्याला खवला मासा असेच संबोधतात.परंतु जे मासे खाण्यातले चोखंदळ आहेत ते या माशाला प्रथम पसंती देतात.या माशाचा रस्सा अत्यंत रुचकर असतो.या रस्याची सर इतर माशांना नाही.त्यामुळे स्थानिक रहिवासी ज्यांना काट्यांचे मासे खाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित जमते ते हमखास या प्रजातीवर जीव लावतात.जवळ जवळ याच माशासारखा दिसणारा दुसरा मासा म्हणजे कोळस.अर्थात ही स्थानिक नावे आहेत.कोळस हा कमी प्रमाणात सापडणारा मासा.कवडस माशाहुनही रुचकर.मासेमारी करणारे लोक हा मासा सापडला तर घरीच ठेवतात.अथवा घरी खाण्यासाठी गिऱ्हाईकापासून लपवून ठेवतात.एकाने सांगितले की ह्या माशाचा रस्सा वरपुन खाल्ल्यास धुंदी येते आणि गाढ झोप लागते.हा मासाही शाकाहारी कुळातला असल्यामुळे सहसा गळाला लागत नाही.
      कवडस आणि कोळस या दोन मशातला फरक वर वर सहसा नवीन माणसाला ओळखू येत नाही.बारकाईने पाहिले असता .कोळस हा मासा कवडस पेक्षा अधिक चमकदार असतो.पाण्यातून बाहेर काढल्यानंतर खूप लवकर खराब होतो.परंतु एक दोन तासाच्या अंतरात खाल्यास याची चव पापलेट पेक्षाही रुचकर लागते.फक्त काट्यांचा नाद करायचा नाही.नदीकडेल जितके काटे जास्त तितका मासा रुचकर हा पक्का समज 
आहे.कारण ज्यांनी कोळस या माशाचा रस्सा खाल्ला आहे त्यांच्यापुढे नदीचे इतर मासे खूप फिके आहेत.
        नदीच्या आत राहता येत नाही म्हणून या माशांच्या सवयी माहीत नाहीत.पण चव माहीत आहे.नदिमायच्या मुलांपैकी हे मला आवडणारे (दिसायला आणि खायलाही)सर्वात सुंदर मासे.इतर ठिकाणी यांना काही प्रादेशिक नावे असतील तर ती इथे नमूद करावीत.
   (वरील फोटोत डाव्या बाजूचे तीन मासे कवडस प्रजातीचे तर उजव्या बाजूचे दोन मासे कोळस या प्रजातीचे आहेत)

माहिती संकलन
भरत दौंडकर

 सौजन्य-भीमा नदी, तालुका शिरूर,जिल्हा-पुणे
close