shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घ्या समजून राजे हो...हेल्मेटसक्तीचा फेरविचार व्हायलाच हवा ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: महाराष्ट्रात  स्वयंचलित दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे हे गेल्या काही वर्षांपासून आवश्यक करण्यात आले आहे. हेल्मेट नसल्यास वाहतूक पोलीस दंड देखील करतात. मात्र आतापर्यंत ही हेल्मेट सक्ती फक्त दुचाकी चालवणाऱ्यालाच होती. दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला ही सक्ती नव्हती. मात्र नुकतीच वाहतूक पोलीस खात्याकडून मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. सहाजिकच ही हेल्मेटसक्ती वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती नको अशी जनभावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होताना दिसते आहे. त्याचबरोबर काही सुजाण नागरिक हे या सक्तीचे स्वागतच करताना दिसत आहेत. त्यामुळेच ही दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना केलेली सक्ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसत आहे. 

मुळात ही हेल्मेटसक्ती करण्यामागे नेमकी भावना काय याचा विचार होणेही गरजेचे आहे. सध्या देशातील रस्तेवाहतूक लक्षात घेता अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असलेली दिसत आहे. अशावेळी दुचाकी वर बसलेला माणूस  अपघात झाला तर सरळ डोक्याच्या भारावर रस्त्यावर आदळतो. अशावेळी त्याच्या डोक्याला जबर इजा होऊन कायमचे अपंगत्व किंवा प्रसंगी मृत्यू देखील येऊ शकतो. म्हणून दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांनी डोक्यात हेल्मेट वापरावे. जेणेकरून अपघात झाला तरी त्याचे डोके सुरक्षित राहील आणि संभाव्य अपंगत्व टळू शकेल, अशी हेल्मेट वापरण्यामागची संकल्पना आहे. 

इथे मुळात प्रश्न असा येतो की अपघात झाला तर हेल्मेटचा उपयोग आहे. मग अपघातच का टाळले जाऊ नयेत? त्यासाठी प्रयत्न का केले जाऊ नयेत? मात्र आपल्या देशात अपघात टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत, हे देशाचे आणि जनसामान्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 

आपल्या देशात अपघात होण्यामागची प्रमुख कारणे शोधल्यास दोन-तीन प्रमुख कारणे सापडतात. सर्वात पहिले कारण म्हणजे रस्त्यावरील खड्डे किंवा नादुरुस्त रस्ते, आपल्या देशात अगदी राष्ट्रीय महामार्गांची अवस्था सुद्धा फारशी चांगली नाही. नाही म्हणायला नितीन गडकरी केंद्रात भूपृष्ठवाहतूक मंत्री झाल्यापासून जे राष्ट्रीय महामार्ग बनत आहेत त्याची अवस्था सध्या तरी चांगली आहे. अन्यथा बाकी राज्य महामार्ग किंवा स्थानिक रस्ते यांची अवस्था बरीच बरी म्हणावी लागेल. रस्त्यावर पायी चालताना किंवा वाहन चालक चालवताना रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न जनसामान्यांना पडत असतो. दिवसाच्या वेळी रस्त्यावरील खड्डे किंवा नादुरुस्त रस्ते दिसतात तरी. रात्रीच्या वेळी तर हे खड्डे किंवा नादुरुस्त रस्ते कधीच लक्षात येत नाहीत. अशावेळी हमखास अपघात होतात. त्यात राष्ट्रीय महामार्ग सोडले तर इतर रस्त्यांवर रात्रीच्या वेळी दिवे सुद्धा नादुरुस्त असतात. त्यामुळे अंधारात रस्त्यावर खड्डे आहेत की नाही हे कधी लक्षातच येत नाही. काही वेळा रस्त्यात माझेच कुठेतरी विजेचे खांब उभे केलेले असतात. ते रस्ता रुंदीकरणापूर्वी रस्त्याच्या कडेला असतात. मात्र नंतर रस्त्याचा विस्तार होतो आणि मधोमध हे खांब येतात. मात्र ते बाजूला कधीच केले जात नाहीत. अनेकदा रस्त्याच्या मध्ये झाडेही असतात. हे बाजूला करण्याचे ही कोणी कष्ट घेत नाही.

नादुरुस्त रस्ते आणि रस्त्यावरील खड्डे ही तर समस्या आहेच. त्याचबरोबर रस्त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी आणून ठेवलेले बांधकाम साहित्य हे देखील अनेकदा अपघाताला आमंत्रण देत असते. मात्र रस्ते बांधणी करणारे कंत्राटदार आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्यस्तरावरील अधिकारी यांना त्याचे काहीच सोयर सूचक नसते. त्यामुळे असे रस्त्यावर पडलेले वाळू गिट्टी किंवा विटांसाठी विटांचे ढीग हे अपघाताला कारणीभूत ठरत असतात. 

काही ठिकाणी हे रस्ते जरूर चांगले असतात. रस्त्याच्या बाजूला चांगले पदपथ सुद्धा बांधलेले असतात. मात्र या पदपथांवर आणि प्रसंगी रस्त्यांवर सुद्धा अनधिकृत अतिक्रमण केलेले दिसते. हे अतिक्रमण सुद्धा अपघातास कारणीभूत ठरते. वस्तूतः पदपथ हा पायी चालणाऱ्यांसाठी असतो. मात्र रस्त्याच्या काठाला असलेले दुकानदार किंवा प्रसंगी घरमालक हे त्यावर अतिक्रमण करतात. दुकानदार दुकानाचे सामान ठेवतात. कित्येकदा ते सामान ठेवण्यासाठी ते पद पथावर पक्के शेड सुद्धा बांधतात. पदोपथाच्या बाजूला निवासी इमारत असली तर तिथले घरमालक हमखास आपली वाहने रात्रभर आणि दिवसभर रस्त्यावर उभी ठेवतात. या सर्व कारणांमुळे हा पदपथ पादचाऱ्यांसाठी बांधलेला असतांनाही त्यांच्या उपयोगाचा ठरत नाही. पादचारी शेवटी मुख्य रस्त्यावरूनच पायी चालतात. ते पायी चालत असताना समोरून येणाऱ्या वाहनासमोर धडकतात आणि त्यामुळे अपघात घडतो.

इथे विशेषतः समोरून दुचाकीस्वार येत असेल तर दुचाकीही पडते आणि पादचारीही आडवा होतो. 

रस्त्यावर अपघातासाठी अनेकदा फिरणारी मोकाट जनावरेही कारणीभूत ठरतात. रस्त्यावरून अनेक जनावरांचे मालक आपली जनावरे मुक्तपणे घेऊन जाताना दिसतात. आपण जाण्यामुळे इतर वाहनांना अडथळा होतो आहे याचे भानही त्यांना नसते. त्याचबरोबर रस्त्यावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी अशा जनावरांना आणि त्यांच्या मालकांना कुठेही अटकाव करीत नाहीत. हे झाले पाळीव जनावरांबाबत. जी बेवारस जनावरे रस्त्यावर फिरतात त्यांची समस्या तर फार गंभीर आहे. प्रत्येक शहरात आणि गावात, प्रत्येक रस्त्यावर पाच पंचेवीस तरी मोकाट कुत्री फिरताना दिसतात. अनेकदा ही कुत्री भांडत भांडत एखाद्या वाहनासमोर येतात. अचानक ही भांडणारी कुत्री आलेली पाहून तो वाहनचालकही भांबावतो आणि हमखास त्याचा अपघात होतो. अर्थात ही बेवारस कुत्री हाकलण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्याही उपाय करीत नाहीत. ही कुत्री पूर्वी मारली तरी जात होती. मात्र आता भूतदया मंडळ वाले पुढे धावतात आणि बेवारस कुत्री मारल्याबद्दल गुन्हा दाखल करतात. त्यामुळे महापालिका अधिकारी काही कारवाई करत नाहीत नाहीत आणि जर एखाद्या वाहनचालकाच्या वाहनाखाली बेवारस कुत्रे आले आणि ते मृत्यूमुखी पडले तर पोलिसात गुन्हा दाखल होतो आणि आधी अपघात झाला म्हणून झालेले नुकसान आणि मग पोलिसांची चल बुलाती यामुळे तो अधिकच त्रासतो. मात्र इथे स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी किंवा पोलीस यांना काहीही सोयर सुतक नसते. 

रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक ही देखील अपघातांना कारणीभूत ठरत असते. आज रस्त्याने जाणारे ८० टक्के पादाचारी किंवा वाहन चालक हे शिस्तीत वाहने चालवतात किंवा चालतात.वाहतुकीचे सर्व नियम पाळतात आणि रस्त्यावरील सिग्नल किंवा पोलिसांचे इशारे याकडेही लक्ष देऊन काळजीपूर्वक पालन करतात. मात्र २० टक्के बेशिस्त वाहनचालक इतर ८० टक्क्याकरिता अपघाताचे कारण ठरत असतात. पोलीस खात्यातर्फे रस्त्यात ठिकठिकाणी वाहतूक पोलीस उभे असतात. या पोलिसांनी अशा बेशिस्त वाहन चालकांना पकडून त्यांना समज देणे प्रसंगी दंड करणे अपेक्षित असते. मात्र वाहतूक पोलीस हे कधीच अशा बेशिस्त वाहनचालकांना पकडत नाहीत. सध्या गेली काही वर्षे हे वाहतूक पोलीस फक्त हेल्मेट डोक्यावर नाही या कारणासाठी दुचाकीस्वारांना पकडतात आणि त्यांना दंड ठोकतात. मात्र ज्यांच्यामुळे अपघात होतात अशा बेशिस्त वाहनचालकांकडे ते निर्धारस्तपणे दुर्लक्ष करतात. परिणामी असे बेशिस्त वाहनचालक निर्धारस्तपणे सिग्नल तोडून बेदरकारपणे वाहन हाकतात आणि अपघाताला कारणीभूत ठरतात. अनेकदा जिथे नो एन्ट्री आहे किंवा रॉंग साईड वाहनचालक वाहन चालवले जात आहे अशा ठिकाणी सुद्धा ते निर्धास्तपणे वाहन चालवतात आणि पोलीस त्यांच्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करतात. 

यासाठी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे यासाठी नागरिकांनाही प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांना कायद्याचा धाक सुद्धा बसला पाहिजे. आपण कायदा मोडला तर आपल्याला दंड होईल ही भीती प्रत्येक नागरिकाच्या मनात बसायला हवी. दुर्दैवाने ती भीती आज कोणाच्याही मनात नाही. या बाबतीत लहान वयापासूनच आणि शालेय स्तरापासूनच मुलांना वाहतुकीची शिस्त लावण्याची आज गरज आहे. 

आज रस्त्या रस्त्यात वाहतूक पोलीस असतात जरूर, पण ते कुठेतरी झाडाखाली निवांत बसलेले असतात. वस्तूतः त्यांनी चौकात उभे राहून वाहतुकीचे नियंत्रण करणे गरजेचे असते. मात्र त्या ऐवजी रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसून गप्पा मारणे यातच पोलीस समाधान मानतात. इकडे वाहतुकीची  ऐसीतैशी होते. त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. 

आज मोठ्या शहरांमध्ये आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पुरेशी पोलीस संख्या ही गरजेची असते. मात्र आपल्याकडे पोलीस संख्या ही कायम अपुरीच असते. मला आठवते १९८३ साली एका कार्यक्रमात तत्कालीन नागपूरचे पोलीस आयुक्त रॉनी मेंडोंसा यांच्याशी गप्पा मारत असताना वाहतूक पोलिसांचा प्रश्न निघाला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली की आम्ही राज्य सरकारला दरवेळी अतिरिक्त पोलीस बळ द्या म्हणून मागणी करत असतो. मात्र आज आम्ही १९७१ साली केलेली मागणीही पूर्ण झालेली नाही. आजही तीच परिस्थिती असल्याचे आढळून येते. गेली अनेक वर्षे विधिमंडळात वृत्तांकन करीत असल्यामुळे अनेकदा पोलिसांच्या अपुऱ्या संख्येबद्दल आमदारांचे प्रश्न असतात. त्यावेळी हे वास्तव लक्षात येते. 

आज अपघात घडण्यासाठी ही प्रमुख कारणे आहेत. राज्य शासन, केंद्र शासन किंवा समाज यांनी या समस्या सुधारण्यासाठी काहीतरी पावले उचलली तर अपघातांची संख्या निश्चित कमी होऊ शकते. मात्र कोणीही या संदर्भात काहीही करत नाही. त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

आज वर्षानुवर्ष रस्त्यावर गड्डे पडलेले असतात, हे काय प्रशासनाला किंवा टोल वसूल करणाऱ्या कंत्राटदाराला दिसत नसतील काय? पण ते कधीच दुरुस्त करत नाहीत. त्यासाठी त्यांना कोणताही दंड केला जात नाही. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची अतिक्रमण हटाव पथके असतात. मात्र ही पथके अतिक्रमण हटवायला जातात आणि चिरीमिरी घेऊन येतात. अतिक्रमण तसेच असते. अनेकदा स्थानिक राजकीय नेते या रस्त्यावरील अतिक्रमण धारकांचे कैवारी बनतात. कारण त्यांना मतांचे राजकारण करायचे असते. मात्र त्यामुळे रस्त्यावर अपघात होतात, हा मुद्दा कधीच विचारात घेत नाहीत. आज देशातील बहुसंख्य पदपथ हे अतिक्रमणग्रस्त आहेत त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, आणि याला जबाबदार असलेल्या कोणालाही कोणताही दंड ठोठावला जात नाही. 

तोच प्रकार बेशिस्त वाहनचालकांबद्दल आणि बेशिस्त पादचाऱ्यांबद्दल आहे. तसेच रस्त्यावर बेवारस कुत्री आणि गाई म्हशी फिरू देणाऱ्या वरही बद्दलही आहे. असे प्रकार होऊ देणाऱ्यांवर आणि यासाठी जबाबदार असणाऱ्या कोणती कारवाई केली जाते याचे उत्तर कधीच मिळत नाही. त्याचवेळी हेल्मेटची मात्र अकारण सक्ती केली जाते. 

हेल्मेटने डोक्याच्या भरावर पडलेल्या माणूस वाचतो हे खरे आहे. मात्र त्याचे अनेक गैरसोयी आहेत. ज्या व्यक्तींना स्पोंडीलाइटिसचा त्रास आहे त्यांना हेल्मेट नव्या आजारांना आमंत्रण देऊ शकते. प्रसंगी त्यांना हेल्मेटच्या वजनाने चक्कर सुद्धा येऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हेल्मेट गैरसोयीचेच आहे. त्याचबरोबर प्रत्येक दुचाकी मालकाला आपल्याजवळ दोन हेल्मेट ठेवणे आवश्यक होणार आहे ते त्याच्यासाठी लोढणे ठरणार आहे जर ऐनवेळी रस्त्यात कोणी मित्र भेटला आणि त्याला लिफ्ट द्यायची झाली तर एरवी हेल्मेट नाही म्हणून दंड ठोठावला जाणार आहे ही भीती कायम त्याच्या मनात राहणार आहे.

हे सर्व मुद्दे लक्षात घेत हेल्मेटसक्ती किती योग्य आहे याचा विचार सर्वच समाज धुरिणांनी करायला हवा आणि ही सक्ती करणाऱ्या प्रशासनावर दबाव आणला जायला हवा. ती आजची गरज आहे अन्यथा कधीतरी जनक्षोभ उफाळून येईल आणि त्यात सर्वच होरपळून निघतील हा धोका लक्षात घ्यायला हवा. 

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे...?
 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो..
close