*एल. जी. बनसुडे स्कूलमध्ये पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन*
इंदापूर :पळसदेव ता.इंदापुर येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. संपूर्ण शाळा भक्तिरसात न्हालेली दिसून आली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर ग्रंथाची पूजा करून झाली. त्यानंतर शाळेच्या आवारातून पालखी मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. यावेळी शाळेतील 775 विद्यार्थी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते .विद्यार्थ्यांनी फुगड्या, भजन, अभंग, लेझीम आणि वेशभूषेत सहभाग घेतला. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा जयघोष केला. यावेळी पळसदेव ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच सौ कोमल ताई बनसुडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या पालखी सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हनुमंत (नाना) बनसुडे, कार्याध्यक्षा नंदाताई (नानी) बनसुडे , सचिव नितीन बनसुडे,बाबा आप्पा बनसुडे, मालन बनकर प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापक सुवर्णा वाघमोडे सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरले. या सोहळ्याने शाळेत भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.