भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना येत्या दोन जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर येथे पोहोचलेली टिम इंडिया हा सामना जिंकून बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असेल. पण त्यांच्यासाठी हे दिसते तितके सोपे असणार नाही. जर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला मालिका १-१ अशी बरोबरी करायची असेल, तर त्यांना एजबॅस्टनमध्ये इतिहास रचावा लागेल. भारताने सन १९६७ मध्ये येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, तेव्हापासून टीम इंडियाने येथे एकही सामना जिंकलेला नाही. म्हणजेच टीम इंडिया ५८ वर्षांपासून या मैदानावर पहिल्या विजयासाठी आतुर आहे.
सन १९६७ मध्ये पहिल्यांदाच भारताने एजबॅस्टन येथे कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये इंग्लंडने भारताचा १३२ धावांनी पराभव केला. यानंतर सन १९७४ मध्ये त्यांना एक डाव आणि ७८ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर सन १९७९ मध्ये त्यांना एक डाव आणि ८३ धावांनी पराभव पत्करावा लागला. सन १९८६ मध्ये दोघांमध्ये खेळलेला सामना अनिर्णित राहिलेला एकमेव कसोटी सामना होता. यानंतर सन १९९६ मध्ये भारताला पुन्हा ८ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. सन २०११ मध्ये इंग्लंडने भारताचा एक डाव आणि २४२ धावांनी पराभव केला तेव्हा टीम इंडियाला या मैदानावर आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. भारताला शेवटचा पराभव सन २०२२ मध्ये सात गड्यांनी गमवावा लागला होता. सन २०१६ मध्ये भारताने येथे चांगली कामगिरी केली होती आणि विजयाच्या जवळ पोहोचला होता, पण इंग्लंडने तो सामना ३१ धावांनी जिंकला. यानंतर, सन २०२२ मध्ये झालेल्या पराभवामुळे, एजबॅस्टनवरील भारताची विजयाची प्रतिक्षा अधिकच वाढली.
इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता टिम इंडिया इतिहास बदलण्याच्या उद्देशाने एजबॅस्टन मैदानावर उतरेल. परंतु यावेळी भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासेल. त्याच्या जागी अर्शदीप सिंग आणि आकाशदीप सिंग सारख्या तरुण गोलंदाजांवर जबाबदारी असेल.
जर भारताला एजबॅस्टनवर पहिल्यांदाच जिंकायचे असेल तर त्यांना प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागेल. जर टीम इंडियाला या मैदानाचा पूर्व इतिहास बदलायचा असेल, तर त्यांना सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखावे लागेल. तसेच त्यांना मिळालेली झेल घेण्याची प्रत्येक संधी साधावीच लागेल.
भारताला आपली रणनीती आणि अंतिम अकरा जणांच्या संघात बदल करावे लागतील. अतिरिक्त वर्क लोडमुळे जसप्रीत बुमराहला दुसरी कसोटी खेळणे कठीण वाटत आहे. अशा परिस्थितीत भारताचा वेगवान मारा खूपच कमकुवत होईल. एजबॅस्टनवर आतापर्यंत पडलेल्या १६५६ विकेट्सपैकी ११८५ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत, गंभीर-गिल जोडी येथेही त्याच फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरेल. बुमराहच्या जागी अर्शदीपला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे, परंतु मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना आता ही जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच वेळी, संघाच्या खालच्या फळीतील फलंदाजांनाही धावा कराव्या लागतील. लीड्समध्ये भारताने पहिल्या डावात ४१ धावांत ७ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ३१ धावांत शेवटच्या ६ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाच्या पराभवाचे हे एक मोठे कारण होते. फलंदाजी मजबूत करण्यासाठी शार्दुल ठाकूरच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली जाऊ शकते.
सध्याच्या भारतीय कसोटी संघात असे चार गोलंदाज आहेत, ज्यांनी यापूर्वी बर्मिंगहॅममध्ये कसोटी खेळली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी येथे प्रत्येकी फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. हे चारही खेळाडू सन २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळले होते, ज्यामध्ये भारताचा सात गड्यांनी पराभव झाला होता. त्या सामन्यात भारताने ३७८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले पण इंग्लंडवर मात करू शकले नाही. त्या सामन्यात बुमराहने भारताची धुरा सांभाळली. त्याने एकूण पाच विकेट्स घेतल्या. तर, सिराजने चार विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याला कोणतेही यश मिळाले नाही. शार्दुलने फक्त एकच विकेट घेतली. जडेजा सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. तसे बघाल तर बुमराह बर्मिंगहॅम कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. कामाचा ताण व्यवस्थापित (वर्क लोड) करण्यासाठी त्यांना विश्रांती दिली जाऊ शकते. जर बुमराहला विश्रांती मिळाली तर, अद्याप कसोटी पदार्पण न केलेला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही अंतिम अकरा संघात स्थान मिळू शकते. त्याने इंग्लंडविरुद्ध ६ कसोटी सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या आहेत.
एकंदर सारासार विचार केला तर बर्मिंगहॅमचं मैदान भारतासाठी लाभदायक ठरलेलं नाही. यापूर्वी भारताला येथे कधीही यश मिळालं नाही म्हणजे येथून पुढेही मिळणार नाही असे नाही. फक्त सकारात्मक दृष्टीकोन व आपल्या बलस्थानांचा योग उपयोग केला तर कोणतंही यश टिम इंडियापासून दूर राहू शकणार नाही.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२