shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“संस्थेच्या हितासाठी कठोर निर्णय!” – अध्यक्ष शरद काबरे यांचा ठाम इशारा.

“संस्थेच्या हितासाठी कठोर निर्णय!” – अध्यक्ष शरद काबरे यांचा ठाम इशारा.

काबरे विद्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण आणि शैक्षणिक सुविधा पुरविण्याची ग्वाही.

एरंडोल (प्रतिनिधी): एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या शरद काबरे यांनी संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांकडून अध्यक्ष म्हणून असलेले अधिकार बेकायदेशीरपणे वापरण्यात येत असल्याचा आणि संस्थेच्या कार्यात हेतुपुरस्कर अडथळे निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

१ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष शरद काबरे यांनी स्पष्ट केले की, "संस्थेच्या घटनेनुसार अध्यक्षाच्या स्वाक्षरीशिवाय कोणतीही बैठक वैध नाही. मात्र, काही व्यक्तींनी बनावट कार्यकारिणी सभा घेऊन खोटे ठराव मंजूर केले आहेत, हे संस्थेच्या हिताविरोधात आहे."

याबाबत अध्यक्ष काबरे यांनी १८ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभेसाठी अधिकृत अधिसूचना दिल्याचे व सचिव श्रीकांत काबरे यांना पत्रही पाठवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून खोटी सभा आयोजित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

काबरे यांनी सांगितले की, “संस्थेच्या घटनेबाहेर जाऊन कोणतीही कारवाई केली गेल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही अध्यक्ष पदावरून हटवण्याचा अधिकार नाही.”

याच परिषदेत त्यांनी हेही जाहीर केले की, दिनांक १८ मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करून उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव यांचे पद रद्द करण्यात आले असून लवकरच नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

दरम्यान, शरद काबरे यांनी काबरे विद्यालयातील इमारतीचे दुरुस्ती कामे वेगाने सुरू असून, छताचे कौल बदलणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाल्याचेही सांगितले.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परिसर कुंपण, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“शाळेच्या कामात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची हमी आम्ही देतो,” असे अध्यक्ष काबरे यांनी ठामपणे सांगितले.

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष ॲड. महेश काबरा, सचिव राजु मणियार, डॉ. नितीन राठी, अनिल बिर्ला, परेश बिर्ला, ॲड. गोविंद झंवर, डॉ. नरेंद्र पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी, “संस्थेची प्रतिष्ठा आणि प्रगती वाचवण्यासाठी आम्ही घटनेनुसारच काम करणार आहोत आणि शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढवणे हेच आमचे ध्येय राहील,” असे अध्यक्ष शरद काबरे यांनी ठामपणे जाहीर केले.

🖋️ – प्रतिनिधी, एरंडोल

( टीप:- वरील सर्व माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषद नुसार आहे.) 

close