चाळीसगाव: शहरातील शिवाजी चौकात भवानी ट्रेडिंगजवळ झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ८.१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०१ ते ०४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS NO ४१/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम ३०५, ३३० (१)(२), ३३१ (३)(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित साजनसिंग टाक आणि त्याचा साथीदार प्रेमसिंग टाक यांचा सहभाग उघडकीस आला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे साजनसिंग टाक (रा. बसस्टँड मागे, चाळीसगाव) व प्रेमसिंग टाक (रा. पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले.
दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १९३०००/- रुपये रोख, ५.१० लाख रुपयांचे ५९.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १.१५ लाख रुपयांचे १३७४.६५ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ८.१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि स्थानीक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
(अधिक तपास सुरू आहे.)


