shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंजाबच्या वादळात आरसीबी भूईसपाट



                  पंजाब किंग्जने नेहल वढेराच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीचा पाच गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. आरसीबी आणि पंजाब यांच्यातील हा सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला आणि हा सामना प्रत्येकी चौदा षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो शेवटी योग्य ठरला. आरसीबीला चौदा षटकांत नऊ गडी गमावून केवळ ९५ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबने फक्त १२.१ षटकांत ५ गडी गमावत ९८ धावा करून सामना जिंकला. पंजाबकडून नेहल वढेराने १९ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद ३३ धावा केल्या. आरसीबीकडून जोश हेझलवूडने तीन तर भुवनेश्वर कुमारने दोन बळी घेतले. या विजयासह पंजाबचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सात सामन्यांत पाच विजय आणि दोन पराभवांसह त्यांचे दहा गुण झाले आहेत. आरसीबीचा सात सामन्यांमधला हा तिसरा पराभव असून चार विजयांसह आठ गुण मिळवून ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत.

                   दिसायला भासणाऱ्या किरकोळ लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवातही चांगली झाली नाही, कारण त्यांनी ३२ धावांत दोन गडी गमावले होते. प्रभसिमरन सिंग १३ धावा करून  परतला आणि प्रियांश आर्य १६ धावा करून बाद झाला. पंजाबने ५० धावांचा टप्पा ओलांडला तेव्हा पंजाबने सात धावा करून बाद झालेला कर्णधार श्रेयस अय्यरची विकेटही गमावली. श्रेयस बाद झाल्यानंतर लगेचच हेजलवुडने १४ धावा केलेल्या आपल्या देशवाशी  जोश इंग्लिसला बाद केले. त्यानंतर नेहल वढेराने काही चांगले फटके खेळून संघाला विजयाच्या जवळ नेले, पण शशांक सिंगच्या रूपाने पंजाबने आपली पाचवी विकेट गमावली. शशांक एक धाव काढून बाद झाला. सामना रोमहर्षक होईल असे वाटत होते, पण नवीन फलंदाज म्हणून आलेल्या मार्कस स्टॉइनिसने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. स्टॉइनिस दोन चेंडूंत सात धावा करून नाबाद परतला.

                   तत्पूर्वी टीम डेव्हिडच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी ९६ धावांचे लक्ष्य ठेवले. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची फलंदाजीही खूपच खराब होती, त्यांच्या डावाच्या शेवटी डेव्हिडने २६ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या, त्यामुळे आरसीबीला १४ षटकांत नऊ गडी गमावून ९५ धावा करण्यात यश आले. डेव्हीडच्या या झुंजार खेळीमुळे किमान थोडीफार समाधानकारक धावसंख्या आरसीबीच्या नावापुढे झळकली.

                    प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली कारण त्यांचा अर्धा संघ ३३ धावांत तंबूत परतला. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि संघाच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या. टीम डेव्हिड शिवाय फक्त कर्णधार रजत पाटीदारला दुहेरी आकडा गाठता आला. पाटीदार १८ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३ धावा करून बाद झाला. पंजाबकडून अर्शदीप सिंग, मार्को जॅनसेन,  यजुवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी दोन तर झेवियर बार्टलेटला एक बळी मिळाला. 

                   आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने आयपीएलमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने १८ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३ धावा केल्या. या खेळीसह त्याने आयपीएल मधील एक हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या बाबतीत त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि रुतुराज गायकवाड यांना मागे टाकले आहे.

                  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी केली. आयपीएलमध्ये फक्त ३० डावात एक हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी साई सुदर्शनने २५ डावात ही कामगिरी केली होती. यादरम्यान रजतने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सीएसकेचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड यांना मागे टाकले. 

                   ही कामगिरी करण्यासाठी सचिन आणि ऋतुराज या दोघांनीही प्रत्येकी ३१ डाव घेतले. आता रजत पाटीदार या दोन दिग्गजांच्या पुढे गेला आहे. आयपीएल मध्ये सर्वात जलद १००० धावा करणाऱ्यात भारतीय फलंदाज साई सुदर्शन- २५ डाव- गुजरात टायटन्स- २०२४, रजत पाटीदार- ३० डाव- आरसीबी- २०२५, सचिन तेंडुलकर - ३१ डाव - २०१०, ऋतुराज गायकवाड- सीएसके, ३१ डाव- २०२२, तिलक वर्मा- मुंबई -३३ डाव-२०१९ मध्ये यांचा समावेश आहे.

                  विद्यमान आयपीएल सध्या जवळ जवळ अर्ध्यावर आली असून आता तरी केवळ डिवचा डिवची सुरू आहे. पण प्लेऑफ मध्ये पोहोचण्याची चढाओढ प्रत्येकाच्या दहा सामन्यानंतर सुरू होण्याची लक्षणे आहे. तूर्त तरी दिल्ली, गुजरात, पंजाब, आरसीबी, केकेआर, लखनौ व राजस्थान अंतिम चार संघात पोहोचण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करत आहेत. हैद्राबाद, चेन्नई तळाला आहेत व ते फार पुढे जातील असं वाटतही नाही. पण पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स छुपा रुस्तम ठरू शकतो.  पिछाडी वरून विजेतेपद मिळविण्यात ते पारंगत आहेत व पाच वेळ हे त्यांनी सिध्दही केले आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेणे इतर प्रतिस्पर्ध्यांना घातक ठरू शकते.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close