shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुजरात टायटन्स अव्वल स्थानी कायम


                    गुजरात टायटन्सने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) ३९ धावांनी पराभव करत अव्वल स्थानावर आपले वर्चस्व बळकट केले. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ३ बाद १९८ धावा केल्या, प्रत्युत्तरात केकेआरला २० षटकांत ८ बाद १५९ धावाच करता आल्या. या मोसमात केकेआरने सलग दोन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

                   केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ३६ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही आणि गुरबाजची विकेट लवकर गमावली. यानंतर रहाणेने सुनील नारायणसोबत संघाची धुरा सांभाळली, पण नारायण १७ धावा करून बाद झाला. त्यानंतर रहाणेने चांगली खेळी सुरूच ठेवली, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला एकही फलंदाज साथ देऊ शकला नाही. मोठी भागीदारी रचण्यात असमर्थता हे केकेआरच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. केकेआरचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी गेल्या सामन्यात त्याला पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता.  

                       केकेआरसाठी रहाणे व्यतिरिक्त आंद्रे रसेलने २१, रिंकू सिंग १७, व्यंकटेश अय्यर १४ आणि रमणदीप सिंगने १ धावा केल्या, तर प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला अंकक्रिश रघुवंशी २७ धावा आणि हर्षित राणा एक धाव करून नाबाद परतला. गुजराततर्फे प्रसीद कृष्णा आणि रशीद खान यांनी प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

                     तत्पूर्वी, केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु गिल आणि सुदर्शन यांनी गुजरातसाठी शंभर धावांची भागीदारी केली ज्यामुळे संघाला मोठे लक्ष्य ठेवण्यात मदत झाली. गुजरातकडून गिलने ५५ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ९० धावा केल्या, तर सुदर्शन ३६ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला.

                     प्रथम फलंदाजी करताना गिल आणि सुदर्शन यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ११४ धावा जोडल्या. गिलने ३४ चेंडूत अर्धशतक तर सुदर्शनने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सुदर्शनचे या मोसमातील हे पाचवे अर्धशतक होते आणि गिलचे तिसरे अर्धशतक होते. गिल आणि सुदर्शन ही जोडी गुजरातसाठी हिट आहे. गुजरातसाठी सर्वात मोठी सलामी भागीदारी करण्याचा विक्रम गिल आणि सुदर्शन यांच्या नावावर आहे. गिल आणि सुदर्शन यांच्यातील ११४ धावांची भागीदारी ही गुजरातसाठी चौथी सर्वोच्च सलामी भागीदारी आहे. गिल आणि सुदर्शन यांनी गुजरातसाठी तीन वेळा शतकी भागीदारी केली आहे, ज्यामध्ये एकदा २१० धावांची भागीदारी समाविष्ट आहे. 

                  विद्यमान आयपीएलमध्ये गिल आणि सुदर्शन हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ही जोडी या हंगामात धुमाकूळ घालत आहे. गिल आणि सुदर्शन यांनी या मोसमात आतापर्यंत आठ डावांत ४४८ धावा जोडल्या असून त्यांची सरासरी ५६.० आहे. गिल आणि सुदर्शन ८.९३ च्या रन रेटने धावा करत आहेत. या जोडीने या हंगामात दोन शतके आणि दोन अर्धशतकांची भागीदारी केली आहे. इतकेच नाही तर या दोघांनी आयपीएल २०२४ पासून १७ डावात एकूण ८ वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे, जी सर्वोच्च आहे. त्याने या बाबतीत ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांना मागे टाकले, ज्यांनी आयपीएल २०२४ पासून २२ डावांमध्ये सात वेळा पन्नास पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.

                     गिल आणि सुदर्शन यांच्यातील ही भागीदारी आंद्रे रसेलने तोडली. सुदर्शन बाद झाल्यानंतर जोस बटलर फलंदाजीस आला आणि त्याने गिलच्या साथीने गुजरातच्या डावाला गती दिली. गिलने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली पण शतक झळकविण्यात तो कमी पडला. यादरम्यान गिल आणि बटलर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी झाली जी वैभव अरोराने तोडली. 

                     कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला धक्का बसला, जेव्हा समालोचक डॅनी मॉरिसनने नाणेफेक दरम्यान त्याला लग्नाबद्दल विचारले. नाणेफेकीच्या वेळी गिल गप्पा मारण्यासाठी आला तेव्हा मॉरिसनने त्याला विचारले, "तू छान दिसत आहेस, लग्नाची घंटा वाजणार आहे का?" तू लवकरच लग्न करणार आहेस का?' मॉरिसनच्या वैयक्तिक प्रश्नावर गिल अस्वस्थ दिसला आणि हसून उत्तर दिले, 'नाही, असे काही नाही.' मॉरिसनने हा प्रश्न विचारल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, मॉरिसनने गिलला हा प्रश्न विचारणे क्रिकेट चाहत्यांना आवडले नाही. गिलला वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल चाहत्यांनी मॉरिसनवर टीका केली. 

                     आयपीएलमधील आपलं केवळ चौथच सिझन खेळत असलेल्या गुजरातने पहिल्या सत्रात विजेतेपद मिळविले, दुसऱ्या सत्रात उपविजेतेपद मिळविले, तिसरे सत्र सपक गेले. मात्र चौथ्या सत्रात ते भन्नाट फॉर्मात असून गुणतालिकेत सर्वाधिक गुण मिळवून आघाडीवर आहेत. शिवाय खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात फॉर्मात असल्याने त्यांचा खेळ उच्च दर्जाचा होत आहे. कर्णधार गिल स्वतः फॉर्मात आहे, शिवाय त्याचे नेतृत्व गुजरातला योग्य दिशेने घेऊन जात आहे. हि भविष्यात भारतीय संघासाठी सुखद बाब असेल.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close