लखनौने शुक्रवारी त्यांच्या घरच्या इकना स्टेडियमवर विद्यमान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. लखनौचा मुंबईवरचा हा सहावा विजय आहे, लखनौने सन २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले तेंव्हापासून मुंबईने लखनौला फक्त एकदाच पराभूत केले आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्शच्या ६० धावा आणि एडन मार्करामच्या ५३ धावांच्या जोरावर २० षटकांत आठ बाद २०३ धावा केल्या. मुंबई संघाने आटोकाट प्रयत्न केले, मात्र संपूर्ण षटके खेळून पाच गडी बाद १९२ धावाच करता आल्या. त्यासाठी सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी खेळली. मुंबईसाठी सूर्यकुमारचा हा शंभरावा आयपीएल सामना होता. सूर्यकुमारने ४३ चेंडूंत नऊ चौकार आणि एक षटकारासह ६७ धावा केल्या, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नव्हता. अशा स्थितीत विल जॅकला रायन रिकेल्टनसोबत डावाची सलामी देण्याची संधी मिळाली. त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाश दीपने त्याला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले. सात चेंडूत पाच धावा करण्यात जॅकला यश आले. यानंतर शार्दुल ठाकूरने रिक्लेटनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याला पाच चेंडूत दहा धावा करता आल्या.
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी झटपट धावा केल्या. दोघांनी ३५ चेंडूत ६९ धावा केल्या. या दोघांची भागीदारी चांगली चालली होती. मग मोक्याचा काळ संपला. यानंतर पुढच्याच चेंडूवर दिग्वेश राठीने नमनला बाद करून मुंबईला तिसरा धक्का दिला. त्याने २४ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि ते वेगाने धावा काढत होते. त्याने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार संघाला विजयापर्यंत नेईल असे वाटत असतानाच आवेश खानने त्याला बाद केले. सतराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अब्दुल समदने त्याचा झेल घेतला.
नंतर सर्व अपेक्षा हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्याकडून होत्या, पण नंतर मुंबईने आश्चर्यकारक निर्णय घेत तिलकला परत बोलावले आणि त्याला निवृत्त घोषित करण्यात आले. त्याच्या जागी मिचेल सँटनर आला, पण चमत्कार घडू शकला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईलाही फायदा झाला कारण स्लो ओव्हर रेटमुळे लखनौला दंड आकारण्यात आला आणि सर्कलमध्ये फक्त चार क्षेत्ररक्षक ठेवावे लागले.
याआधी अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. काळ्या मातीची खेळपट्टी नीट समजून घेण्यात तो अपयशी ठरला. घरच्या मैदानावर पंजाबविरुद्ध दारूण पराभव पत्करावा लागलेल्या लखनौ संघाने या सामन्यात दमदार सुरुवात केली. एडन मार्करम मार्शसह डावाची सलामी देण्यासाठी मैदानात उतरला.
विशेषत: मार्शच्या स्फोटक फलंदाजीमुळे लखनौने चालू हंगामात पहिल्यांदाच पॉवरप्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही आणि अकरा पेक्षा जास्त धावांच्या सरासरीने ६९ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतके झळकावून मोसमाची चांगली सुरुवात करणाऱ्या या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने अवघ्या २७ चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने तिसरे अर्धशतक पूर्ण केले.
मुंबईसाठी धोकादायक ठरत असलेल्या मार्शचा डाव विघ्नेश पुथूरच्या अप्रतिम झेलने संपुष्टात आला. मार्शने ६० धावांच्या खेळीत ३१ चेंडूंचा सामना करत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. दुसऱ्या टोकाला मार्करामने धावांची सरासरी वाढवत राहिली. त्याला साथ देण्यासाठी आलेला कॅरेबियन फलंदाज निकोलस पूरन याने लाँग-ऑनवर षटकार ठोकून शानदार सुरुवात केली, पण पुढच्याच षटकात हार्दिकला पंड्याचा उसळणारा चेंडू समजू शकला नाही आणि अंतिम टप्प्यात दीपक चहरने पूरनचा सोपा झेल घेतला.
मात्र, यानंतर मधल्या फळीत आयुष बडोनीने १९ चेंडूत ३० धावा केल्या आणि डेव्हिड मिलरने १४ चेंडूत २७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाची धावसंख्या २०० धावांवर नेली. अखेरच्या षटकात एलएसजीने झटपट विकेट गमावल्या. हार्दिक पांड्या हा मुंबईचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने पाच विकेट घेतल्या.
आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आणि एलएसजीचा कर्णधार रिषभ पंतचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. हार्दिक पांड्याच्या चेंडूवर विचित्र शॉट खेळून तो झेलबाद झाला. चालू मोसमातील सलग चौथ्या सामन्यात पंतची बॅट नि:शब्द राहिली. त्याला क्रीजवर वेळ घालवता येत नाही. पंतच्या मागील चार डावात दोन, १५, शून्य आणि दोन अशी धावसंख्या आहे. निश्चितच कर्णधाराची निराशाजनक कामगिरी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवत आहे. पंत बाद झाल्यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका यांचा चेहरा पडला होता.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने शुक्रवारी लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध असे काही केले जे त्याच्या १८ वर्षांच्या इतिहासात यापूर्वी घडले नव्हते. पांड्याने आपल्या गोलंदाजीने ही कामगिरी केली आहे. पंड्याने एकना स्टेडियमवर शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. यासह तो लीगच्या इतिहासातील पहिला कर्णधार बनला आहे.
पांड्याने या सामन्यात चार षटकात ३६ धावा देत पाच बळी घेतले. त्याने निकोलस पूरन, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, आकाशदीप यांचे बळी घेतले. तसं पाहिलं तर पंड्याने लखनौच्या बड्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने बळी बनवले आहेत.
यासह पांड्या आयपीएलच्या इतिहासात एका डावात पाच विकेट घेणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याच्याआधी आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराने हा पंजा उघडला नव्हता. यासह, आयपीएल आणि टी- २० कारकिर्दीत पहिल्यांदाच पांड्याने एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. पंड्याने या सामन्यातील खेळपट्टी चांगल्या प्रकारे समजून घेतली आणि त्यानुसार गोलंदाजी केली. पंड्याने स्लोअर बाउन्सरला आपले शस्त्र बनवले आणि विकेट्स घेतल्या. पूरण आणि पंतसारखे तुफानी फलंदाज या सापळ्यात अडकले आणि स्वस्तात बाद झाले.
मात्र, पंड्याने पाच विकेट घेतल्या नंतरही तो लखनौला २०० धावांचा टप्पा पार करण्यापासून रोखू शकला नाही. याचे कारण म्हणजे सुरुवातीच्या षटकांमध्ये मिचेल मार्शची झंझावाती खेळी ज्याने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मार्शने ३१ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. त्याच्या शिवाय एडन मार्करामने ३८ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा शुक्रवारी लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. या सामन्यात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पांड्याने सांगितले की, रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाही.
रोहित संघाच्या पहिल्या तीन सामन्यात खेळला, पण त्याच्या बॅटमधून धावा काढल्या नाहीत. त्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय होता. या सामन्यात रोहित फॉर्ममध्ये परतेल, अशी अपेक्षा होती, मात्र ही शक्यता मावळली असून रोहित संपूर्ण आयपीएलमधून बाहेर पडण्याची भीती आहे.
या सामन्यात रोहितच्या खेळण्याचा त्याच्या फॉर्मशी संबंध नाही. रोहितला दुखापत झाली आहे आणि त्यामुळेच तो या सामन्यात खेळत नाहीये. पांड्याने सांगितले की, सरावा दरम्यान रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच तो या सामन्यात खेळला नाही. रोहितबाबत पांड्या म्हणाला की, रोहितच्या गुडघ्यावर नेटमध्ये चेंडू आदळला होता.
मात्र, रोहित किती सामन्यांसाठी बाहेर आहे आणि त्याच्या दुखापतीची तीव्रता याबद्दल पांड्याने माहिती दिलेली नाही. रोहितने या मोसमात तीन सामने खेळले असून केवळ २१ धावा केल्या आहेत. रोहितच्या जागी राज अंगद बावाला संघात स्थान मिळाले आहे. तो मुंबईसाठी पदार्पण करत आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्जचा भाग होता. राज अष्टपैलू असून उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता.
या पराभवानंतर चार सामन्यात तीन पराभव व एकच विजय असे समिकरण असलेल्या मुंबईची गुणतालिकेत घसरण झाली आहे. आता मात्र येथून पुढे मुंबईला सावधगिरी बाळगावी लागेल. अन्यथा त्यांच्या मिशनला धक्का पोहोचू शकतो.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२

