इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने शासनाने चालू केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला सन्मान पुरस्कार 31 मे रोजी द्यावा.
अनिताताई खरात यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना जनजागर यात्रेमार्फत पुरस्कार वितरणासाठी स्मरणपत्र देण्यास केली सुरुवात.
इंदापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 31 मे रोजी पुरस्कार वितरण करण्यात यावा म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्मरणपत्र देण्यासाठी जनजागर यात्रेला अनिताताई खरात यांच्या माध्यमातून दि. 7मे 2025 रोजी पासून सुरवात करण्यात आली. या जागर यात्रेचे चाकाटी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करून व आम्ही या पुरस्काराचे नक्कीच वितरण करू असा शब्दही देण्यात आला.
तेजपृथ्वी फाउंडेशन ग्रुपच्या अध्यक्षा सौ अनिताताई खरात या माहिती देताना म्हणाल्या की, 9 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे जीआर काढण्यात आला असून प्रत्येक ग्रामपंचायतने 31 मे रोजी ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात यावा. त्याप्रमाणे 31 मे 2023 रोजी सर्व ग्रामपंचायत ने हा पुरस्कार महिलांना प्रदान केला. परंतु 31मे 2024 या दुसऱ्या वर्षापासून ग्रामपंचायतींना याचा विसर पडला. ज्या अहिल्यादेवी होळकरांनी आपले पूर्ण आयुष्य समाजासाठी गोरगरिबांसाठी महिलांसाठी देश हितासाठी दिले त्यांनी कधीही जात-पात धर्म पाहिला नाही. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा पुरस्कार फक्त एक वर्ष देऊन थांबवणे हे कुठेतरी अडमूटपणाचे लक्षण आहे.म्हणूनच तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या पुरस्काराचे वितरण करण्यासाठी व त्यांना स्मरण करून देण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी जाऊन सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य जे कोणी उपस्थित असतील त्यांना व गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांना असे लेखी पत्र देण्याचे ठरवले व त्यांनी त्याची सुरुवात आज चाकाटी या गावापासून केली आहे.
तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतने असा पुरस्कार 31मे 2025 रोजी दिला नाही तर मी अनिता खरात 31 मे नंतर इंदापूर पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर पुरस्कार न देणाऱ्या ग्रामपंचायतचा निषेध म्हणून त्या ग्रामपंचायतचे नाव बोर्ड वरती लिहून एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करणार व त्या ग्रामपंचायतीची तक्रार गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहेत, आणि आपल्या तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतचे नाव बोर्डवर टाकून त्यांचा निषेध करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून पत्राद्वारे त्यांनी सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांना आव्हान केले आहे.