shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा – अंतिम फेरी मुंबईत ६ मेपासून दिमाखात रंगणार!

३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा – अंतिम फेरी मुंबईत ६ मेपासून दिमाखात रंगणार!

मुंबई
(गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. ही स्पर्धा ६ मे ते १६ मे २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर (प.), मुंबई येथे रंगणार आहे.

राज्यभरातील नामांकित नाट्यसंस्था या अंतिम फेरीत सहभागी होत असून, त्यांचे दर्जेदार प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर होणार आहेत. प्रत्येक प्रयोग रात्री ८:३० वा., तर अंतिम दिवशीचा प्रयोग शुक्रवार, १६ मे रोजी दुपारी ४ वा. आयोजित करण्यात आला आहे.

*स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:*

मंगळवार, दि. ६ मे – उर्मिलायन

बुधवार, दि. ७ मे – सूर्याची पिल्ले

गुरुवार, दि. ८ मे – शिकायला गेलो एक

शुक्रवार, दि. ९ मे – मास्टर माइंड

शनिवार, दि. १० मे – ज्याची त्याची लव्हस्टोरी

सोमवार, दि. १२ मे – नकळत सारे घडले

मंगळवार, दि. १३ मे – थेट तुमच्या घरातून

बुधवार, दि. १४ मे – गोष्ट संयुक्त मानापमानाची

गुरुवार, दि. १५ मे – असेन मी... नसेन मी...

शुक्रवार, दि. १६ मे (दुपारी ४ वा.) – वरवरचे वधू-वर

या नाट्यस्पर्धेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार (महाराष्ट्र शासन) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अॅड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य विभाग) यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम अधिक व्यापक झाला आहे.

विकास खारगे (भाप्रसे), मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग, तसेच विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे संपूर्ण आयोजनाचे प्रमुख आधारस्तंभ असून, त्यांनी सर्व नाट्यरसिकांना या कलाविष्कारांचा अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रत्येक प्रयोगासाठी तिकीट दर ₹५०/- व ₹३०/- असून, काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तिकीटविक्री संबंधित प्रयोगाच्या दिवशीच नाट्यगृहात करण्यात येईल.

मराठी रंगभूमीच्या उज्ज्वल परंपरेला साजेशी अशी ही नाट्यस्पर्धा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी एक आनंददायी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

close