गुंडेगाव – कै. प्रकाश शंकर येठेकर यांच्या प्रथम वर्ष श्राध्द निमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून येठेकर सरांच्या जीवनातील कार्याचा आणि कर्तृत्वाचा उज्ज्वल आढावा घेतला.
प्रकाश येठेकर सर हे एक समर्पित शिक्षक होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात शेकडो विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे, तर संस्कार, प्रामाणिकपणा आणि जीवनमूल्यांची शिकवण दिली. ग्रामीण भागातील मुलांसाठी ते नेहमी धावत असत. गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वेतनातून मदत केली, कित्येकदा स्वतःच्या वाहनाने विद्यार्थ्यांना शाळेत आणले.
हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी सांगितले की, "येठेकर सर हे शिक्षक म्हणूनच नव्हे तर समाजसुधारक म्हणूनही आपले काम करत होते. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांची कर्मनिष्ठा, साधेपणा आणि सेवाभाव प्रेरणादायी आहे." तसेच बाप काय असतो याबद्दल महाराजांनी जे काय सांगितले तो विषय प्रत्येक बापाला भावला.
कार्यक्रमास नातेवाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पत्रकार रमेश जेठे सर, पोलीस निरीक्षक गुंजाळ साहेब,आप्तेष्ट
माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन येठेकर सरांच्या स्मृतीला अभिवादन केले.
त्यांची आठवण आजही शाळा, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मनात ताजीतवानी आहे. त्यांच्या कार्याचा वसा पुढील पिढीने घेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.