दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा दुसऱ्या दिवशी लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात खेळ थांबेपर्यंत आठ बाद १४४ धावा केल्या आहेत आणि त्यांची एकूण आघाडी २१८ धावांची झाली आहे. खेळ थांबला तेव्हा मिचेल स्टार्क (१६) आणि नॅथन लायन (१) खेळत होते.
गुरुवारी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण १४ विकेट्स पडल्या. यापूर्वी, पहिल्या दिवशीही तेवढ्याच विकेट्स पडल्या होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित सहा विकेट्स घेतल्या, तर दक्षिण आफ्रिकेनेही खेळ संपेपर्यंत कांगारू संघाला आठ धक्के दिले. ऑस्ट्रेलियाने आज पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १३८ धावांत गुंडाळून ७४ धावांची आघाडी घेतली. तथापि, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांनी फक्त ७३ धावांत सात विकेट गमावल्या. त्यानंतर अॅलेक्स कॅरीने मिचेल स्टार्कसोबत आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाची आघाडी २०० धावांच्या पुढे नेली. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, रबाडाने कॅरीला ४३ धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलिया कडून दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन २२, स्टीव्हन स्मिथ १३, उस्मान ख्वाजा ६, ट्रॅव्हिस हेड ९, ब्यू वेबस्टर ९ आणि कर्णधार पॅट कमिन्सने ६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर मार्को जानसेन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, ऑस्ट्रेलिया आपली आघाडी वाढविण्याचा तर दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा डाव लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करेल.
तत्पूर्वी, कर्णधार पॅट कमिन्सच्या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १३८ धावांत गुंडाळले. अशाप्रकारे कांगारू संघाला ७४ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१२ धावा केल्या होत्या, परंतु कर्णधार कमिन्सच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर कांगारूंना आघाडी घेण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने सहा, मिचेल स्टार्कने दोन आणि जोश हेझलवूडने एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी इतकी खराब होती की संघाचे फक्त चार फलंदाजच दुहेरी आकडा गाठू शकले.
दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक ४५ धावा केल्या, तर कर्णधार टेम्बा बावुमा ३६ धावा करून बाद झाला. रायन रिकलटनने १६ धावांचे योगदान दिले आणि काइल व्हर्नीने १३ धावा काढल्या. कमिन्सने डावात पाच बळी घेतले. विद्यमान चक्रात कमिन्सने सर्वाधिक वेळा सहा वेळा बळींचे पंचक पूर्ण केले. त्याने सन २०२३-२५ चक्रात सहाव्यांदा असे केले. एवढेच नाही तर कमिन्स सध्याच्या डब्ल्यूटीसी पर्वात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही बनला आहे. सन २०२३-२५ या हंगामात त्याने आतापर्यंत ७९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने बळींचे पंचक व सर्वाधिक बळी घेण्याच्या प्रकारात भारताच्या जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी एकमेव मोठी भागीदारी कर्णधार टेंबा बवुमा आणि बेडिंगहॅम यांच्यात झाली. दुसऱ्या दिवशी चार बाद ४३ धावांवरून पुढे सुरूवात करताना या दोन्ही फलंदाजांनी धावा वाढविण्याचा प्रयत्न केला. बवुमा आणि बेडिंगहॅम यांनी पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली, पण ही भागीदारी तुटताच दक्षिण आफ्रिकेचा डावही कोसळला. दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डरने सहा, ट्रिस्टन स्टब्सने दोन, केशव महाराजने सात आणि कागिसो रबाडाने एक धाव केली, तर एडेन मार्कराम आणि मार्को जानसेन यांना खातेही उघडता आले नाही.
कांगारूंचा कर्णधार कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण केले आणि असे करणारा तो आठवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला. कमिन्स ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. तो ग्लेन मॅकग्राथ, मिचेल स्टार्क, डेनिस लिली, मिचेल जॉन्सन आणि ब्रेट ली यांच्या यादीत सामील झाला आहे.
कमिन्सने कर्णधार म्हणून नवव्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच किंवा अधिक विकेट्स घेणारा कर्णधार इम्रान खान आहे, त्याने १२ वेळा हा पराक्रम केला. कमिन्स आणि रिची बेनॉ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांनी प्रत्येकी नऊ वेळा ही कामगिरी केली आहे. याच सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानेही बळींचे पंचक साधत स्वतःचे ३०० कसोटी बळी पूर्ण केले होते.
गुरुवारी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण १४ विकेट्स पडल्या. यापूर्वी, पहिल्या दिवशीही १४गडी बाद झाले होते. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित सहा फलंदाजांना झटपट, तर दक्षिण आफ्रिकेनेही खेळ थांबेपर्यंत कांगारू फार मोठी वळवळ करू दिली नाही.
आपण लॉर्ड्सवरील लक्ष्य साध्य करण्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ते ऑस्ट्रेलियासाठी चांगली परिस्थिती दर्शवते. या मैदानावर आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये चार वेळा २०० पेक्षा धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पाठलाग करण्यात आले आहे, परंतु सन २००५ नंतर असे फक्त एकदाच घडले आहे. अशा परिस्थितीत, दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होणार नाही. आतापर्यंतच्या खेळाकडे पाहता, या सामन्यात गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे स्पष्ट होते आणि लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा मार्ग सोपा असणार नाही.
पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क हे त्रिकूट कोणत्याही फलंदाजी क्रमासाठी अडचणी निर्माण करू शकतात. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही दोन गडी शिल्लक आहेत आणि दक्षिण आफ्रिकेला कठीण लक्ष्य मिळावे म्हणून संघाला ही आघाडी २५० च्या पुढे वाढवायची असेलच. लॉर्ड्सवरील रेकॉर्ड पाहिल्यास, ऑस्ट्रेलिया कदाचित वर्चस्व गाजवेल, परंतु दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा क्रम देखील मजबूत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये चांगली गोलंदाजी केली, पण ऑक्टोबर २०२४ पासून तो कसोटीत सर्वाधिक नो-बॉल टाकणारा खेळाडू ठरला आहे. या काळात रबाडाने ५७ नो-बॉल टाकले आहेत, जे इतर कोणत्याही गोलंदाजाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. दुसऱ्या स्थानावर जसप्रीत बुमराह आहे, ज्याने विद्यमान चक्रात २४ नो बॉल टाकले आहेत. या कालावधीत, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी एकूण ११३ नो बॉल टाकले आहेत, जे सर्वाधिक आहे.
हा सामना आता निर्णायक वळणार पोहोचला असून पहिले दोनही दिवस गोलंदाजांनी वर्चस्व गाजविल्याचे स्पष्ट दिसते. त्यातच ऑस्ट्रेलियन गोलंदाज पहिल्या डावात वरचढ ठरल्याने आधीच हॉट फेव्हरिट असलेल्या कांगारूंच्या दावेदारीला बळकटी आली आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने शेवटचा चेंडू पडेपर्यंत त्यात भविष्यवाणी करणे योग्य नसते. त्यामुळे आफ्रिकन संघाला कमी लेखणे कांगारूंनी धोक्याचे ठरू शकते.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२