प्रतिनिधी:- पारोळा तालुक्यातील सुमठाणे गावाजवळील वनक्षेत्रात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा पारोळा पोलीस स्टेशन व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासातून लागला आहे. अवघ्या दोन दिवसांत आरोपीचा शोध लावून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
२६ जून रोजी सुमठाणे गावाजवळील राखीव कुरणात एका ४५ ते ५० वयोगटातील महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता पवार, व उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख उंदीरखेडे येथील शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८) अशी पटली.
शोभाबाई कोळी यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) तपासताना सुमठाणे गावातील अनिल गोविंदा संदांशिव (वय ४५) याच्यावर संशय गेला. तो घटनेनंतर फरार झाला होता. मात्र, २८ जून रोजी धुळे जिल्ह्यातील शिताणे गावाजवळ मोटारसायकलवर जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने शोभाबाई कोळी यांचा खून केल्याची कबुली दिली. पीडितेसोबत पूर्वीपासून ओळख असलेल्या आरोपीने तिला विश्वासात घेऊन जंगलात नेले आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रकमेच्या लालसेपोटी हत्या केली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पारोळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.