shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फार्मसी करियर एक सुवर्णसंधी : प्रा. डॉ. गणेश शंकर म्हस्के.

फार्मसी करियर एक सुवर्णसंधी : प्रा. डॉ. गणेश शंकर म्हस्के.
इंदापूर : फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) म्हणजे काय ?
फार्मसी किंवा औषधनिर्माणशास्त्र म्हणजे नेमकं काय तर, हे एक शास्त्र आहे जे औषधांच्या निर्मिती, त्यांचे गुणधर्म, त्यांची चाचणी, त्यांचा वापर आणि मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करते. आपण जी औषधे घेतो ती तयार झाल्यावर थेट रुग्णांना दिली जात नाहीत; त्याआधी त्यांची सखोल परीक्षण केले जाते, कारण ती रसायनांपासून बनवलेली असतात. या औषधांमधील रसायनांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घेणं फार्मसीचं मुख्य कार्य आहे. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचे उत्पादन फार्मास्युटिकल कंपन्या करतात. थोडक्यात, एखादा आजार ओळखणे, रोखणे, तपासणे आणि त्यावर उपचार करण्यासाठी संशोधन करणे. या सर्व गोष्टींसाठी फार्मसी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.
फार्मसी करियर एक सुवर्णसंधी 
कोरोना आणि इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे लसीकरणावर जगभर संशोधन सुरू आहे. याचप्रमाणे सॅनिटायझर आणि इतर सुरक्षात्मक उपायांचे महत्त्वही वाढले आहे. यामुळे औषधनिर्माण शास्त्रातील संधी पुन्हा एकदा उजागर झाल्या आहेत. औषध उत्पादन, संशोधन आणि क्लिनिकल ट्रायल्सच्या क्षेत्रात करिअरसाठी मोठ्या संधी उघडल्या आहेत. ज्यांना संशोधनाची आवड आहे आणि त्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी औषधनिर्माण शास्त्र एक उत्तम पर्याय ठरतो. औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) हा एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. रुग्णांच्या जीवनात औषधांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. जिथे वैद्यकशास्त्र रोगांचे निदान शिकवते, तिथे औषधनिर्माण शास्त्र त्या रोगावर योग्य औषध कसे वापरावे आणि ते कसे तयार करावे, हे शिकवते. प्रत्येकाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या आजारासाठी औषध घेणे आवश्यक असते, म्हणूनच औषधनिर्माण शास्त्र हे वैद्यकशास्त्र आणि रुग्ण यामधील महत्त्वाचे दुवा आहे. विविध क्षेत्रातील  संधीबद्दल माहिती खालीलप्रमाणे,
सरकारी क्षेत्रातील करिअर संधीमध्ये प्रामुख्याने, ड्रग इन्स्पेक्टर, ड्रग कंट्रोल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, रिसर्च आणि डेव्हलपमेंट संस्था, अन्न व औषध प्रयोगशाळा, रेल्वे व संरक्षण सेवा इ. 
खाजगी क्षेत्रातील करिअर संधीमध्ये औषध निर्माण कंपन्यामध्ये प्रामुख्याने, प्रॉडक्शन, क्वालिटी कंट्रोल (QC), क्वालिटी अ‍ॅश्युरन्स (QA), रिसर्च अँड डेव्हलपमेंट, फार्मास्युटिकल मार्केटींग, क्लिनिकल रिसर्च असोसिएट, रेग्युलेटरी अफेअर्स एग्जीक्यूटिव, मेडिकल कोडिंग व मेडिकल रायटिंग, रिटेल आणि हॉस्पिटल फार्मसी, मार्केटिंग आणि सेल्स प्रतिनिधि, ऑनलाइन फार्मसी, शिक्षणक्षेत्र, कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन सायंटिस्ट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट/ब्रँड मॅनेजमेंट कॉस्मेटिक सल्लागार/सौंदर्य क्लिनिकमध्ये करिअर इ. 
उच्च शिक्षण (M. Pharm, MBA in Pharma Management, Pharm. D/Clinical Pharmacy, PG Diploma in Regulatory Affairs/Clinical Research/ Pharmacovigilance, GRE/TOEFL परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परदेशात शिक्षण व नोकरी इ.
उद्योजकतेच्या संधी मध्ये औषध विक्रीचे मेडिकल स्टोअर व एजन्सी, ई-फार्मसी, औषध निर्मिती उद्योग, क्लिनिकल रिसर्च संस्था/ फार्माकोविजिलन्स सेवा, नवीन हेल्थकेअर प्रॉडक्ट्स/ सप्लिमेंट्स डेव्हलप करणे, फार्मसी कोचिंग क्लासेस/शैक्षणिक संस्था, फार्मा मार्केटिंग कन्सल्टंसी, FMCG व हेल्थकेअर प्रॉडक्ट्सची फ्रँचायझी, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणे इ.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स , ड्रग डिस्कवरी, डेटा अ‍ॅनालिटिक्स, पर्सनलायझ्ड मेडिसिन, डिस्पेन्सिंगमधील ऑटोमेशन, बायोइन्फॉर्मॅटिक्स, फार्माकोजिनोमिक्स, फार्मकोविजिलन्स डेटा सायंटिस्ट, फार्माकोइकोनॉमिक्स इ.
फार्मसी प्रवेश पात्रता –
1. D. Pharm (डी.फार्मसी कालावधी- २वर्षे) 
१२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
भौतिकशास्त्र (PHYSICS), रसायनशास्त्र (CHEMISTRY) आणि जीवशास्त्र (BIOLOGY) किंवा गणित (MATHEMATICS) आवश्यक आहेत. 
PCM किंवा PCB दोन्ही ग्रूप असेल तरी चालेल किंवा, दोन्ही पैकी एक ग्रूप असेल तरी चालेल.
2. B. Pharm (बी.फार्मसी कालावधी-४वर्षे)

१२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण – Physics, Chemistry, आणि Biology/Mathematics.
PCM किंवा PCB दोन्ही ग्रूप असेल तरी चालेल किंवा, दोन्ही पैकी एक ग्रूप असेल तरी चालेल.
MHT-CET 2025/NEET 2025 परीक्षेत NON-ZERO SCORE/ असणे आवश्यक आहे. म्हणजेच MHT-CET 2025/NEET 2025 परीक्षेत शून्य मार्क नसावेत.


प्रवेश प्रक्रिया कशी असते -
विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतली जाणारी सीईटी (MHT-CET) परीक्षा देणे आवश्यक असते. डी.फार्मसी प्रवेशासाठी कोणतीही सीईटीप्रवेश परीक्षा आवश्यक नसते. 
शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून महाराष्ट्र शासन नियमांच्या अंतर्गत सर्व मुलींना १२वी नंतर सर्व पदवी, पदविका, पदवोत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 
१२वी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी किमान ४५% (खुला वर्ग) आणि ४०% (राखीव वर्ग) गुण आवश्यक होते ती "किमान गुणांची अट" रद्द करण्यात आली आहे. 
१२ वी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण दोन्ही गटांतील (Group A व Group B) विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र आहेत. 
यानंतर विद्यार्थ्यांना  डी. फार्म कालावधी (कालावधी-दोनवर्ष ),बी.फार्म (कालावधी- चारवर्ष ) किंवा फार्म. डी (कालावधी- सहावर्ष) या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. डी.फार्म उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी, बी. फार्मसी द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतात. बी. फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला असताना पदवीत्तर पदवी शिक्षण प्रवेश प्रक्रियासाठी जीपॅट परीक्षा द्यावी लागते. यानंतर एम.फार्म (कालावधी- दोनवर्ष) किंवा फार्म.डी. (पोस्ट बॅचलरेट) च्या चौथ्या वर्षाला प्रवेश मिळतो. पदवीत्तर पदवी म्हणजेच एम. फार्म झाल्यानंतर पीएच.डी (कालावधी तीन ते चार वर्षे ) करता येते. बी. फार्म पूर्ण झाल्यानंतर एमबीए,  एलएलबी यासारख्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. पदवी अभ्यासक्रमानंतर परदेशात जाऊन एम. एस., पीएच.डी देखील करता येते.ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात आवड आहे ते आयसीआरआय पदवीत्तर पदवी पातळीवर जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात .परदेशी संस्था कडून हुशार विद्यार्थ्यांना यासाठी फेलोशिप मिळण्याची ही संधी उपलब्ध आहे.करियर घडविण्यासाठी फार्मसी हे क्षेत्र फारच योग्य आहे.
देशांतर्गत संधी शिवाय परदेशातही जसे अमेरिका, फ्रान्स,जर्मनी, सिंगापूर, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व इतर अनेक देशांमध्ये फार्मसी क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रानंतर फार्मसी हे एकमेव क्षेत्र आहे की, ज्यात झपाट्याने वाढ झालेली दिसून येते. औषध क्षेत्रातील उलाढाल पाहता आपला देश विकसित देशा समवेत गणला जातो. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या पूर्वीपासूनच लक्षणेनीय राहिलेली आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत या अभ्यासक्रमाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
राज्य व केंद्र सरकारचा औषधनिर्मिती शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक असून त्या प्रमाणात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. म्हणूनच येणाऱ्या काळात फार्मसी करिअर एक उत्तम सुवर्णसंधी आहे.
फार्मसी पदवीधर केवळ नोकरीपुरते मर्यादित नाहीत, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेकांची आरोग्यसेवा सुधारण्यास मदत करू शकतात. औषध, तंत्रज्ञान आणि सेवा यांचा संगम योग्य प्रकारे केल्यास फार्मसीमध्ये उद्योजकतेसाठी मोठी संधी आहे. व्यवसायातील कल्पकता, शिस्त आणि सामाजिक भान ठेवून या क्षेत्रात यश मिळवता येते. 

लेखन:
प्रा. डॉ. गणेश शंकर म्हस्के,
प्राचार्य,
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर, पुणे.
close