प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
विनापरवाना आणि धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे पिस्तुल सारखे शस्त्र हातात घेऊन त्याचे फोटो सोशल मीडिया वरून व्हायरल करणाऱ्या चौघां विरुद्ध केज पोलिसांनी कारवाई करून, गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.सदर आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत व त्यांचे काही राजकारण्यांसोबत चांगले संबंध आहेत व या संबंधांच्या जोरावर हे सर्व सामान्य वर ताक निर्माण करत होते अशी चर्चा वीडा जिल्हा परिषद सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अवैध सावकारी, गावातील लोकांना रोजरोज ञास देणे हे त्यांचे नित्याचेच झाले होते असे देवगाव येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या बाबतची माहिती अशी की, सोशल मीडियाच्या व्हाट्सअप स्टेटसवर पिस्टल सारखे शस्त्र हातात घेऊन त्या द्वारे दहशत निर्माण करून धाक बसविण्यासाठी ते फोटो व्हायरल केल्या प्रकरणी केज पोलिसांनी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव यांच्या तक्रारी वरून गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे, पांडुरंग रामा मुंडे (सर्व रा. देवगांव ता. केज जि. बीड) आणि रामचंद्र परसराम ओमासे (रा. बेडा ता. जि. सांगली) या चौघा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३८०/२०२५ भा. न्या. सं. ३५३ आणि शस्त्र अधिनियम ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव, रशीद शेख यांनी गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे, पांडुरंग रामा मुंडे या तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिन्ही आरोपी सद्या केज पोलिस ठाण्यात अटक आहेत.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे तपास करीत आहेत.
------------
घटनास्थळ सांगली जिल्ह्यातील :- या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता सदर फोटो त्यांनी सांगली जिल्ह्यातून सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याची माहिती मिळते. या गुन्ह्यातील आरोपी रामचंद्र परसराम ओमासे (रा. बेडा ता. जि. सांगली) याला अद्याप ताब्यात घेतले नसून शस्त्र देखील हस्तगत करण्यात आलेले नाही.