जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची आढावा बैठक
जिमाका वृत्तसेवा - अहिल्यानगर
जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी संबंधित विभागांनी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, विनापरवानगी उभारलेले गतीरोधक तत्काळ काढावेत आणि अधिकृत थांब्यांवरच वाहने थांबवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, एस. आर. वर्पे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, वसंत पंदरकर, अभिजित पोटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन ड्रंक अँड ड्राईव्ह, रिफ्लेक्टर, हेल्मेट आदींची तपासणी करावी. अपघातस्थळी पोलीस, सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे पाहणी करून अपघातांचे विश्लेषण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ब्लॅकस्पॉटवरील अपघातांची माहिती घेऊन तेथे सुधारणा कराव्यात.’’
‘‘अनेकदा अनधिकृत थांब्यावर बस थांबवल्या जातात, परिणामी अपघात होतात. यासाठी अधिकृत थांब्यांवरच बस थांबतील, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक बसमध्ये तक्रार क्रमांक प्रदर्शित करावा,’’ अशाही सूचना त्यांनी दिल्या.
‘‘जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी गतीरोधक उभारण्यात आले आहेत. या गतीरोधकांमुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे ते काढून टाकावेत व आवश्यकतेनुसारच गतीरोधक ठेवावेत. गतीरोधकांच्या ठिकाणी रिफ्लेक्टर व सूचना फलक बसवावेत. बीओटी तत्त्वावरील रस्त्यांच्या दुरुस्त्यांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्या करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात,’’ असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111