प्रतिनिधी - एरंडोल येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या अंजनी नदीच्या पात्रात सर्वत्र हिरव्यागार वनस्पतींसह काटेरी झुडुपे यांची वाढ झाल्यामुळे पात्रासह नदीचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.नदीच्या पात्राची स्वच्छता करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे की पाटबंधारे विभागाची आहे असा प्रश्न पार्यावरण प्रेमींमध्ये उपस्थित केला जात आहे.
अंजनी नदीच्या पात्राची स्वच्छतेअभावी अत्यंत दुरावस्था झाली असून नदीला नाल्याचे व गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शहरातील सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून याठिकाणी डुकरे व कुत्र्यांचा संचार वाढलाआहे.काळ्या बंधा-यापासून नवीन मोठ्या पुलाच्या पुढे नदीच्या पात्रात सर्वत्र काटेरी झुडुपे,हिरव्यागार जलपर्णी वाढल्यामुळे पात्राचेविद्रुपीकरण झाले आहे.पात्रात वाढलेल्या जलपर्णी,काटेरी झुडूपांमुळे नदीचे पात्र आहे की जंगल आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.सर्वत्र वाढलेल्या वनस्पतींमुळे नदीचे पात्र हिरवेगार झालेआहे.नगरपालिकेतर्फे दरवर्षी पालिकेच्यावतीने नदी पात्राची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात येते मात्र प्रत्यक्ष स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.नदीपात्राच्या स्वच्छतेसह संवर्धन
करण्याची जबाबदारी पालिकेची आहे की पाटबंधारे विभागाची आहे असा प्रश्न उपस्थित केला जात असून दोन्ही विभागांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.सद्यस्थितीत नदीच्या पात्राचा उपयोग नागरिकांकडून नैसर्गिक विधीसाठी केला जात असतांना देखील पालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.अंजनी नदीच्या पात्रात दररोज नैसर्गिक विधीसाठी येणा-या नागरिकांच्या संख्येमुळे शहराची वाटचाल “हागणदारीमुक्ती कडून हागणदारी’कडे सुरु असल्याचे नागरिकांमध्ये उपरोधिकपणे बोलले जातआहे.नदीपात्रात प्रात:विधी करणा-यांविरुद्ध पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.पात्रालगत असलेल्या सर्व सार्वजनिक शौचालय वस्वच्छता गृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पात्रातच सोडले जात असते.पात्रात सांडपाणी जमा होत असल्यामुळे याठिकाणी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा मुक्तपणे संचार वाढला असून सर्वत्र प्लास्टिक पिशव्या,बाटल्या,थर्माकोलचे ढिगारे जमा झाले आहेत.धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास अंजनी प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात विसर्ग केला जातो.
प्रकल्पातील विसर्गा मुळे हिंगोणा,जवखेडे,कल्याणे,भोद या गावांना देखील लाभ मिळत असतो.नदीच्या पात्रातील वाळूसाठा संपुष्टात आल्यामुळे सर्वत्र खडक व दगडांचे अवशेष शिल्लक राहिले आहेत.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी वर्षभर वाहणा-या अंजनी नदीचे पात्र पावसाळ्यात देखील कोरडे राहत असून केवळ सांडपाणी वाहण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.नदीच्या पात्राची स्वच्छता केल्यास नदीला गतवैभव प्राप्त होणार असतांना देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेवून अंजनी नदीच्या पात्राची स्वच्छता करून नदीला गतवैभव प्राप्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.