*खेतेवाडीच्या परमिटवर अकोलेला रेशन! – सामाजिक कार्यकर्त्यांची कारवाईतून घोटाळा उघड!
*वाळूनंतर रेशन घोटाळा – अकोले तालुक्यात प्रशासकीय भ्रष्टाचाराची मालिका!
*संदीप शेणकर, सचिन शेटे, नितीन नाईकवाडी यांनी पकडले रेशनचे वाहन; मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस!
अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील वाळू तस्करीचा भंडाफोड झाल्यानंतर आज पुन्हा एकदा रेशन वितरणात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पुरवठा शाखा व संबंधित सप्लायर यांच्यावर गरीब लाभार्थ्यांच्या वाट्याचे रेशन अपहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
आज अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेणकर, माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन शेटे, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख नितीन नाईकवाडी यांनी एक संशयास्पद रेशन गाडी अकोले सोसायटीमध्ये खाली करताना रंगेहात पकडली.
विशेष म्हणजे, सदर गाडीवरील परमिट हे खेतेवाडी रेशन दुकानासाठी होते. मात्र गाडी अकोले सोसायटीत रेशन खाली करत होती. अधिक चौकशीत, अकोले सोसायटीला मार्च महिन्याचे रेशन अजून आलेले नव्हते, अशी माहिती समोर आली. त्यामुळे हा शिधा एवढ्या दिवसांपासून कुठे होता, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सप्लायर, तहसील कार्यालय व गोडाऊन यामधील साठ्याबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे. सदर रेशनचा साठा गोडाऊनमध्ये होता का, की तो सप्लायरकडेच ठेवून दिला होता, की तो रेशन काळ्या बाजारात विकून पुन्हा खेतेवाडीच्या नावाखाली आणून अकोले सोसायटीत खाली केला जात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संदीप शेणकर यांनी विचारले की, "परमिट नसताना हा माल गाडीमध्ये भरून सोसायटीत कसा गेला? दोन गाड्यांमध्ये ७० क्विंटल म्हणजेच १४० कट्टे तांदूळ भरले होते. त्यापैकी एक गाडी अकोलेत खाली होत होती. ही अतिशय गंभीर बाब आहे."
यावेळी उपस्थित पुरवठा निरीक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिली, मात्र त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे देखील स्थानिकांनी सांगितले. गोडाऊन किपरने देखील "मी कोणतेही चलन दिलेले नाही," असे स्पष्ट सांगितले.
हा सारा प्रकार पाहता, अन्नधान्य घोटाळा केवळ एक अपघाती घटना नसून, यामागे रचना करून राबवण्यात आलेली आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या प्रकरणात तहसीलदार, सप्लायर, गोडाऊन किपर, व पुरवठा शाखेची जबाबदारी निश्चित करून तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.