shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जबरी लुटीचा थरार संपला!२४ तासांत एरंडोल पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

जबरी लुटीचा थरार संपला!२४ तासांत एरंडोल पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

तीन आरोपी अटकेत, मुद्देमालासह मोबाईल आणि दुचाकी जप्त.

एरंडोल – प्रतिनिधी जयहिंद चौकातील एका गृहिणीवर झालेल्या जबरी लुटीच्या गुन्ह्याचा एरंडोल पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले दागिने, मोबाईल फोन आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

घटनेचा तपशील...

दि. ६ जुलै २०२५ रोजी रात्री २ ते ३ वाजेदरम्यान फिर्यादी उषाबाई भिका बडगुजर (वय ५२, व्यवसाय – गृहिणी, रा. जयहिंद चौक, गांधीपुरा, एरंडोल) या गाढ झोपेत असताना तिघा-चौघांनी त्यांच्या घरात शिरून त्यांच्या तोंडावर कपडा बांधला, हातपाय दोरीने बांधले आणि मारहाण करत त्यांच्या अंगावरील ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.५ ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली.

या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात दि. ७ जुलै रोजी गु.र.नं. १०७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०९(६), ३(५), ३५१(२), ३५२, ३३१(२), ११५(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास व अटकेची यशस्वी मोहीम...

पोलिस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

गोपनीय माहितीच्या आधारे मयूर अरुण बडगुजर (वय २०, रा. जगवानी नगर, जळगाव) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार नंदू भगवान निकुंभ (वय ३३, रा. जुने जळगाव) आणि तुषार सुनिल महाजन (वय २२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनाही अटक करण्यात आली.

जप्ती व पुढील तपास...

आरोपींकडून ३ मोबाईल फोन, १ मोटारसायकल तसेच चोरी गेलेल्या मालाची जप्ती करण्यात आली आहे. उर्वरित माल मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.

ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणारे अधिकारी पुढीलप्रमाणे:

पो.नि. निलेश गायकवाड, स.पो.नि. शंकर पवार, पोहेकॉ अनिल पाटील, पो.ना. दीपक पाटील, पो.ना. योगेश महाजन, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. अमोल भोसले, पो.कॉ. आकाश शिंपी, पो.कॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांनी महत्वाची भूमिका बजावली.



close