दुर्गम परिस्थितीवर मात करून तेजश्री बिऱ्हाडेने गाठले वैद्यकीय शिक्षण तर यश सोनवणेने मिळवली IIT खरगपूर मध्ये प्रवेश;सत्कार समारंभात कौतुकाचा वर्षाव.
प्रतिनिधी – एरंडोल:
“गरिबी ही यशाच्या मार्गातील अडथळा नसून तीच प्रेरणास्थान ठरु शकते,” असे स्पष्ट मत माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांनी व्यक्त केले. ते एरंडोल तालुक्यातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ. मकरंद पिंगळे, विद्यार्थ्यांचे पालक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्येही तेजश्री ईश्वर बिऱ्हाडे हिने आपल्या जिद्द व आईच्या मेहनतीच्या जोरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तिच्या वडिलांचे लहानपणी निधन झाल्यानंतर तिच्या आईने घरोघरी धुणीभांडी करून तिला शिक्षण दिले.
तसेच, यश गौतम सोनवणे — एका रिक्षा चालकाचा मुलगा — याने कोणतेही क्लासेस न लावता केवळ सोशल मीडियावर मार्गदर्शन घेत IIT खरगपूर या देशातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळवून गावाचे नाव उज्वल केले.
या दोघांच्या यशाचा गौरव करताना गायकवाड व डॉ. पिंगळे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते व त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसून येत होता.