shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विंडीज क्रिकेटची बिकट परिस्थिती बदलेल का ?


                   एकेकाळी जागतिक क्रिकेटवर एकतर्फी दबदबा असलेल्या विंडीज क्रिकेटची हालत अतिशय बिकट झाली असून 'कोणीही या आणि टिकली मारून जा ' अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. मग ते क्रिकेटचे वनडे, टि२० किंवा कसोटी असे कोणतेही प्रारूप असो. त्यांचा सामना जगातल्या कोणत्याही मैदानावर असो, प्रतिपक्षी संघ कोणताही असो, सामन्याचा निकाल फारसा वेगळा नसतो. सामन्याच्या शेवटी विजयी संघ त्यांचा प्रतिस्पर्धी असतो व विंडीजचे खेळाडू खाली माना घालून निराश मनाने तंबूकडे परतत असतात. मागील वनडे, टि२० विश्वचषक, चॅम्पीयन्स ट्रॉफीला तर ते पात्रही ठरले नव्हते. डब्ल्यूटीसीच्या नऊ जणांच्या गटात मागील तीनही सत्रात ते तळालाच राहिले आहेत. 


               हे सगळं घडत असताना त्यांची मैदानावरील कामगिरी सुधारण्याचे नावही घेत नाही अथवा तसे कोणते लक्षणही दिसत नाही. नुकतीच डब्ल्यूटीसी अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरूध्द स्वतःच्या घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका संपन्न झाली. हे तिनही सामने त्यांच्या प्रतिद्वंद्वयाने अक्षरशः एकतर्फी जिंकले. शेवटच्या कसोटीत तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांची शब्दशः मजा घेतली.

               ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या किंगस्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ तर २७ धावांवरच सर्वबाद झाला. कसोटी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वात छोटी धावसंख्या आहे. यापूर्वी सन १९५५ मध्ये न्यूझीलंडचा संघ २६ धावांवर गारद झाला होता. अशा परिस्थितीत, हा ७० वर्षातील सर्वात कमी स्कोअर आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना १७६ धावांनी जिंकला. कांगारू संघाने याबरोबर कसोटी मालिकाही ३-० अशी खिशात घातली.


                  या कमी धावसंख्येच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, वेस्ट इंडिजचा पहिला डाव १४३ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला १२१ पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत आणि त्यामुळे वेस्ट इंडिजला २०४ धावांचे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी ६ बाद ९९ या धावसंख्येवरून खेळ सुरू केला. दुसऱ्या डावात कॅमेरॉन ग्रीनने संघासाठी सर्वाधिक ४२ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने ५ आणि शमार जोसेफने ४ विकेट घेतल्या. जस्टिन ग्रीव्हजने एक बळी मिळविला.

                   विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे ७ खेळाडू शून्यावर बाद झाले. त्यांच्याकडून जस्टिन ग्रीव्हज हा एकमेव खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकला. त्याने २४ चेंडूत ११ धावा केल्या. ग्रीव्हजला स्कॉट बोलँडने बाद केले. पुढच्या दोन चेंडूंमध्ये शमार जोसेफ आणि जोमेल वॉरिकन यांना बाद करून बोलँडने हॅटट्रिक घेतली. यानंतर संपूर्ण वेस्ट इंडिज संघ २७ धावांवर भुईसपाट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने दुसऱ्या डावात ६ आणि बोलँडने ३ बळी घेतले. जोश हेझलवूडला एक विकेट मिळाली.

                  वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये संघाचा सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि कर्णधार रोस्टन चेस यांचा समावेश होता. याशिवाय केल्व्हन अँडरसन, ब्रँडन किंग, शमार जोसेफ, जोमेल वॉरिकन आणि जेडेन सील्स यांचा समावेश होता. 


                 ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ४०० विकेट्स पूर्ण केल्या. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजचे ३ बळी घेतले. स्टार्कने ७.३ षटकांत ९ धावा देत ६ बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. स्टार्कने ३ सामन्यांच्या मालिकेत एकूण १५ विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला मालिकावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्या दरम्यान स्टार्कने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४०० बळीही पूर्ण केले. तो ४०० कसोटी विकेट्स घेणारा चौथा ऑस्ट्रेलियन आहे. त्याच्या आधी शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा आणि नॅथन लायन यांनी ४०० हून अधिक फलंदाज बाद केले आहेत.

                 जागतिक क्रिकेटमध्ये जर असा कोणताही प्रकार असेल जिथे फलंदाजांना स्वतःला सिद्ध करणे सर्वात कठीण असेल तर ते कसोटी क्रिकेट आहे. याचे एक उदाहरण वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दिसून आले, ज्यामध्ये तिन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी करणे कठीण काम असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत, या कसोटी मालिकेतही असेच दृश्य दिसले जे ३० वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमधील मालिकेत दिसले होते.

                  वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघातील एकाही फलंदाजाला शतक झळकविता आले नाही. या कसोटी मालिकेतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी विंडीजच्या ब्रँडन किंगने खेळली, त्याने ७५ धावा केल्या. अशा परिस्थितीत ३० वर्षांनंतर, कसोटी क्रिकेटमध्ये तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या मालिकेत असे दिसून आले आहे, जेव्हा एकाही फलंदाजाला शतक करता आले नाही. यापूर्वी सन १९९५ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा दोन्ही संघातील एकाही फलंदाजाने शतक केले नव्हते.

                एकही शतक नसलेल्या तीन किंवा त्याहून अधिक कसोटी मालिका पुढीलप्रमाणे : - इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा (१८८२). ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा (१८८८). न्यूझीलंडचा भारत दौरा (१९६९). वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा (१९८६). झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा (१९९३). न्यूझीलंडचा भारत दौरा (१९९५). ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा (२०२५).

                ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीची सुरुवात उत्तम पद्धतीने केली आहे.  त्यांनी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने जिंकून ते १०० टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. सध्या, श्रीलंकेचा संघ ६६.६७ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा संघ ६१.११ टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

                 भारताने इंग्लंडमध्ये दोन सामने गमावले असल्याने गुणतालिकेत चौथे स्थान गाठले आहे. डब्ल्यूटीसीची हि सुरूवात असून प्रत्येक संघाला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यास वाव आहे. त्यासाठी प्रत्येक संघाने संधीचा फायदा घ्यायला हवा. शेवटी एक प्रश्न मनात राहातोच, विंडीज क्रिकेटची बिकट परिस्थिती बदलेल का ?
close