एरंडोल न. पा. च्या अकार्यक्षम-बेजबाबदार प्रशासनाविरूध्द बेमुदत उपोषण.
दि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
एरंडोल - येथील नपाचा कारभार सुमारे चार वर्षांपासून (प्रशासकीय राजवट) रामभरोसे सुरू असून नागरीकांच्या समस्यांकडे (मुलभूत गरजा-समस्या) दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. काही समस्यांसाठी तर प्रत्यक्ष भेटून, चर्चा करून देखील निष्पन्न मात्र शून्य, त्यामुळे एरंडोल शहर संघर्ष समिती (नोंदणीकृत - नोंदणी क्र. महा/21253/जळगांव) तर्फे प्रांत कार्यालयासमोर दि. 21 जुलै 2025 पासून सकाळी 10 वा. प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहे.
एरंडोल प्रांताधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल शहर संघर्ष समिती तर्फे नपाकडे दि. 7/1/2025, 2/3/2025, 1/7/2025 रोजी लेखी तक्रार-समस्यांबाबत निवेदन देवून देखील दखल न घेतल्याने केवळ नाईलाज म्हणून उपोषणाचा कटू निर्णय घ्यावा लागलाआहे (अकार्यक्षम प्रशाासनाविरूध्द). उपोषणा दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडल्यास एरंडोल न. पा. प्रशासन जबाबदार राहील हेही स्पष्ट केले आहे.
संघर्ष समितीच्या न्याय्य मागण्या पुढीलप्रमाणे-
* सध्या पावसाळा सुरू असल्याने शहरातील रस्त्यांवर सर्वत्र चिखल असून खड्डे पडलेले आहेत. त्यांची त्वरीत दुरूस्ती व्हावी.
* शहरात दररोजची स्वच्छता व्हावी.
* शासनाने 98 लाख रू. विपश्यना केंद्रासाठी दिले ते त्वरीत व्हावे.
* अमृत योजनेची कामे (पाईप लाईन, पाणी टाक्या) संथगतीने सुरू असून त्वरीत करावीत.
* जलशुध्दीकरण केंद्र असून शुध्द पाणीपुरवठा व्हावा.
* शहरात घाणीमुळे डास-मच्छर वाढले असून नियमित औषध फवारणी व्हावी.
* आठवडे बाजार नियोजित ठिकाणी भरावा (नवीन ठिकाणी)
* अवाजवी करवाढ रद्द करावी - दंडव्यात आकारू नये.
* नवीन वसाहतींमध्ये बगीचा, सुधारणा व्हावी.
* अंजनी नदी स्वच्छता व्हावी. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रविंद्र लाळगे, नामदेवराव पाटील, स्वप्निल सावंत, दिनेश चव्हाण, प्रमोद महाजन, प्रकाश पाटील, प्रवीण महाजन आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती आमदार अमोलदादा पाटील, तहसिलदार एरंडोल, मुख्याधिकारी एरंडोल, पोलिस निरीक्षक एरंडोल यांना पाठविल्या आहेत.