इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत नवा अव्वल क्रमांकाचा कसोटी फलंदाज बनला आहे. त्याने आपल्याच देशाच्या जो रूटला मागे टाकून हे स्थान मिळविले. एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ब्रूकने १५८ धावा केल्या, ज्यामुळे तो रूटला मागे सारू शकला. त्याच वेळी, कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत रूट दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तो ब्रूकपेक्षा १८ रेटिंग गुणांनी मागे राहिला. याशिवाय भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा फलंदाज जेमी स्मिथ यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. गिलने १५ स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुण मिळविले. तो फलंदाजांमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच वेळी, स्मिथनेही टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. कसोटी अष्टपैलूंमध्ये भारताचा रविंद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे आणि कसोटी गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर आहे.
एजबॅस्टन येथे गिलने २६९ आणि १६१ धावा केल्या आणि भारताने इंग्लंडवर ३३६ धावांनी विजय मिळविला व मैदानावर भारताचा पहिला कसोटी विजय नोंदवला. त्याच वेळी, गिलने कसोटी कर्णधार म्हणून आपला पहिला विजय देखील नोंदविला. उजव्या हाताने फलंदाजी करणारा गिल आता ब्रूकपेक्षा फक्त ७९ रेटिंग गुणांनी मागे आहे. कसोटी फलंदाजांमध्ये ब्रूकनंतर रूट (दुसरे), केन विल्यमसन (तिसरे), यशस्वी जयस्वाल (चौथे) आणि स्टीव्ह स्मिथ (पाचवे) यांचा क्रमांक लागतो. गिल आणि यशस्वी यांच्याव्यतिरिक्त, रिषभ पंत देखील टॉप १० मध्ये आहे. तो एका स्थानाने घसरला आणि सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला.
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथलाही कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळाले आहे. त्याने भारताविरुद्ध एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात नाबाद १८४ आणि दुसऱ्या डावात ८८ धावा केल्या. बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ३६७ धावा काढल्यानंतर वियान मुल्डरने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ३४ स्थानांनी प्रगती करत २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. ब्रायन लाराचा सर्वोच्च कसोटी धावसंख्येचा विक्रम मोडण्याची संधी असताना, मुल्डरने दक्षिण आफ्रिकेचा डाव ५/६२६ धावांवर घोषित केला. २७ वर्षीय मुल्डरने कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत १२ स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
अनुभवी भारतीय खेळाडू रविंद्र जडेजा कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे तर त्याचा सहकारी जसप्रीत बुमराह अव्वल कसोटी गोलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या चांगल्या कामगिरीनंतर त्याचा भारतीय संघातील सहकारी मोहम्मद सिराज कसोटी गोलंदाजांच्या यादीत सहा स्थानांनी प्रगती करत २२ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर वेस्ट इंडिजचा शमार जोसेफ सहा स्थानांनी प्रगती करत २९ व्या स्थानावर पोहोचला आहे आणि अल्जारी जोसेफ सहा स्थानांनी प्रगती करत ३१ व्या स्थानावर पोहोचला आहे.
श्रीलंकेने घरच्या मैदानावर बांगलादेशवर २-१ असा विजय मिळवल्यानंतर ताज्या एकदिवसीय क्रमवारीत काही बदल झाले आहेत. कर्णधार चारिथ असलंका एकदिवसीय फलंदाजांच्या ताज्या यादीत दोन स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. गिलने अव्वल क्रमांकावरील आपली मजबूत पकड कायम ठेवली. बांगलादेशविरुद्ध मालिकावीर म्हणून निवड झाल्यानंतर त्याचा श्रीलंकेचा सहकारी कुसल मेंडिस याच यादीत १० स्थानांनी झेप घेऊन १० व्या स्थानावर पोहोचला आहे, तर त्याचाच देशबांधव वानिंदू हसरंगा तीन सामन्यांमध्ये नऊ विकेट्स घेत एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत ११ स्थानांनी झेप घेऊन आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १० जुलैपासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू होत आहे. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. एजबॅस्टन कसोटीतील विजयामुळे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ उत्साहात आहे आणि आता त्यांचे लक्ष या सामन्यातील विजयावर असेल. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने लीड्समध्ये पाच विकेट्सने विजय मिळवला होता, तर टीम इंडियाने एजबॅस्टनमध्ये ३३६ धावांनी विजय मिळवून इतिहास रचला होता. लॉर्डसवर भारत जिंकला तर भारतीय खेळाडूंना पुन्हा एकदा आपले आयसीसी मानांकन सुधारण्यास मदत होईल.
भारताने सन१९३२ मध्ये लॉर्ड्सवर पहिली कसोटी खेळली. आतापर्यंत ९३ वर्षांत टीम इंडियाने या मैदानावर एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत आणि फक्त तीनच जिंकले आहेत. भारतीय संघाने १२ सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे आणि चार कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. सन १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने येथे पाच विकेट्सने विजय मिळवला होता, तर सन २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने लॉर्ड्सवर ९५ धावांनी विजय मिळवला होता. सन २०२१ मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने येथे १५१ धावांनी विजय मिळवला. आता शुभमन गिलला लॉर्ड्सवर विजय मिळवणारा चौथा भारतीय कर्णधार बनण्याची संधी आहे. गिलच्या संघात विजय मिळविण्यासाठी सर्व ताकद आहे. अलिकडेच त्याच्या संघाने एजबॅस्टन येथे इतिहास रचला. एजबॅस्टन येथे कसोटी जिंकणारा भारतीय संघ पहिला आशियाई संघ बनला आणि गिल हा पहिला आशियाई कर्णधार बनला. आता तो लॉर्ड्समध्येही चमत्कार करू शकतो.
आतापर्यंत या मैदानावर १० भारतीय फलंदाजांनी शतके झळकविली आहेत. यापैकी केएल राहुल हा एकमेव खेळाडू आहे, जो अजूनही खेळत आहे. आठ डावांमध्ये तीन शतकांसह दिलीप वेंगसरकर या यादीत अव्वल स्थानावर आहेत. अजित आगरकर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एम. एच मांकड, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, रवी शास्त्री आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी लॉर्ड्सवर प्रत्येकी एक शतक झळकविले आहे. आता शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना या यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्याची सुवर्णसंधी आहे. दोघेही सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहेत.
भारताचे सर्वच खेळाडू सध्या चांगल्या फॉर्मात आहेत, त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करून टिम इंडियाला मालिकेत आघाडी मिळवून देण्याची संधी असून स्वतःचे मानांकन वधारून घेणेही शक्य आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस लॉर्डस कसोटी व त्यात खेळणारे सर्वच खेळाडू सर्वांचे आकर्षण असणार आहेत.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२