प्रतिनिधी जावेद शेख / राहुरी
राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील सोनमाळ वस्तीवर सोमवारी, दि. ७ जुलै २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने धाडसी हल्ला चढवत स्थानिक शेतकरी दिनकर गोपीनाथ जाधव यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. या झपाट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा जागीच फडशा पडला.ही घटना समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सततच्या बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणेही धोक्याचे वाटत आहे.
या घटनेमुळे दिनकर जाधव यांचे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील अन्य शेतकरीही हादरले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी या भागात बिबट्याचा वावर वाढल्याचे निदर्शनास आणून दिले आणि तातडीने पिंजरे बसवून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांनी वनविभागाला वेळेवर योग्य पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहे, नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात जनावरे किंवा माणसांवरही हल्ल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111