shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुष्यातले सांगाती १४,वामनराव चोरघडे‌ ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत



जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आज १६ जुलै २०२५, मराठी कथेला एक नवे वळण देणारे विख्यात मराठी साहित्यिक स्वर्गीय वामनराव चोरघडे यांची आज १११ वी जयंती आहे. मराठी साहित्य विश्वात आपल्या लेखणीने आणि कुशाग्र बुद्धीने आपले एक आगळे वेगळे असे स्थान त्यांनी निर्माण केले होते. त्यांचा आणि माझा जवळ जवळपास १८ वर्षाचा संपर्क आला. त्यात हा एक ख्यातनाम  साहित्यिक म्हणून गाजलेला माणूस अगदी तुमच्या आमच्या सारखाच साधा आहे हे लक्षात आले होते. 

वामन कृष्ण चोरघडे या नावाशी परिचय शालेय जीवनापासूनच झाला होता. मला आठवते मी सहाव्या वर्गात असताना माझ्या मुंजीत अनेक सुहृदांनी मला वाचनीय पुस्तके भेट म्हणून दिली होती. त्यात वामनराव चोरघडे यांचे अबोली हे बालकादंबरी असलेले पुस्तक देखील होते. ती कादंबरी मी वाचली आणि कधीतरी या व्यक्तीला आपण भेटूया असा विचारही मी केला. त्यावेळी मी जेमतेम अकरा वर्षाचा होतो. नंतर शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकताना वामनराव चोरघडे यांचे काही धडे देखील आम्हाला होते. त्याच काळात त्यांचे इतर साहित्य देखील वाचण्यात  आले होते. त्यामुळे भेटण्याची इच्छा अधिकच वाढती होती.

मात्र त्यांची माझी भेट घडून यायला नंतर अकरा वर्षाचा कालखंड लोटावा लागला. त्यावेळी मी नुकताच मुंबई दूरदर्शन चा वृत्त छायाचित्रकार म्हणून विदर्भात काम सुरू केले होते. १९७६ च्या नोव्हेंबर महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे वैदर्भीय लेखिका संमेलन झाले होते. त्याचे वृत्त संकलन करायला मी गेलो होतो. तिथे उद्घाटक म्हणून आलेल्या विख्यात मराठी साहित्यिक गिरिजा कीर यांचा माझा परिचय झाला. तिथे सरकारी विश्रामगृहात आमच्या आजूबाजूलाच खोल्या होत्या. त्यामुळे गिरिजाताईंशी खूप गप्पा झाल्या आणि मैत्री देखील झाली. त्या नागपुरात आल्या की वामनराव चोरघडे यांच्या घरीच उतरतात असे त्यांनी सांगितले होते. नंतर मुंबईला आला की तू भेट म्हणूनही त्यांनी निमंत्रण दिले होते. 

त्यानुसार लगेचच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मी मुंबईला गेलो होतो. तिथे गिरिजाताईंची भेट झाली. त्यावेळी त्यांनी मी नागपूरला मामा गंधेंकडल्या लग्नासाठी येते आहे आणि तिथूनच एक कथाकथनाचा कार्यक्रमही करणार आहे असेही त्यांनी सांगितले. नागपूरला आलो की आपण भेटू असे आमचे ठरले होते. 

त्याच दरम्यान चंद्रपूर येथे नागपूरच्या जैन क्लबने दिव्यांग मुलांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केले होते त्या शिबिराचे वृत्त संकलन करायला मी गेलो होतो. तिथे वामनरावांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत चोरघडे यांचा माझा परिचय झाला. त्यांनी देखील गिरिजाताई येत आहेत तेव्हा घरी ये म्हणून मला निमंत्रण दिले. 

ठरल्यानुसार जानेवारी १९७७ च्या अखेरच्या आठवड्यात गिरीजा ताई आल्या. लग्नात त्यांची माझी भेट झाली होतीच. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी चोरघडेंकडे मला बोलावले. तिथे गेलो असता गिरीजाताईंनी "चल तुला बाबांची भेट करून देते" म्हणून तळमजल्यावर असलेल्या वामनराव चोरघडे यांच्या अभ्यासिकेत त्या मला घेऊन गेल्या. तिथे एका कॉटवर सतरंजी टाकून समोर लेखनाची छोटीशी पेटी ठेवून खादीचा पायजमा आणि अंगात खादीचीच बंडी घातलेले एक धीर गंभीर व्यक्तिमत्व बसलेले होते. गिरीजाताई मला त्यांच्याकडे घेऊन गेल्या आणि माझा परिचय करून दिला "बाबा हा अविनाश पाठक दूरदर्शनचा छायाचित्रकार आहे. नुकताच वणीला आमचा परिचय झाला. आज श्रीकांतचे वेल बेबी क्लिनिक बघायला त्याला बोलावले होते. म्हणून तो आला आहे." माझा परिचय झाल्यावर  वामनराव माझ्याकडे बघत हसले आणि लगेचच "बसा पाठक" म्हणून बाजूच्याच खुर्चीवर मला बसवून घेतले. मग त्यांनी माझी चौकशी केली. कुठे राहता घरी कोण कोण आहे अशी सर्व माहिती जाणून घेतली आणि अधून मधून भेटत चला असे सांगून आमची ती भेट आटोपती घेतली. तितक्यात क्लिनिक मध्ये गेलेले डॉ श्रीकांत चोरघडे घरी आले होते. मग त्याच्यासोबत बोलण्यासाठी मी उठलो. 

त्यानंतर मग अधून मधून माझ्या आणि श्रीकांत चोरघडे यांच्या भेटी होऊ लागल्या. मग कधी घरी गेलो की तळमजल्यावरच्या वामनरावांच्या  अभ्यासिकेत मी डोकावायचो. धीरगंभीर वामनराव कधी लेखनात तर कधी वाचनात गुंतलेले असायचे. बरेचदा संध्याकाळी ते धरमपेठ भागात पायी पायी फिरायचे. त्यावेळी दिसले की हमखास नमस्कार व्हायचा. मग "काय पाठक कसं काय" म्हणून ते चौकशी करायचे. वेस्ट हायकोर्ट रोडवर धरमपेठेत असलेले नंद भंडार हे मिठाईचे दुकान त्यांचे आवडते होते. कधी कधी ते तिथेही बसलेले दिसायचे. विदर्भ साहित्य संघात काही कार्यक्रम असला की हमखास ते भेटायचे. एव्हाना मराठी  वांङमय विश्वात वामनराव चोरघडे यांचे काय योगदान आहे आणि त्यांचे काय स्थान आहे हे देखील मी माहीत करून घेतले होते. नागपूरच्या जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स मधून ते निवृत्त झाले होते. त्याआधी स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यामुळे आयुष्यभर त्यांनी खादीच वापरली
त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वादातीत होती. मात्र त्यातही त्यांचा साधेपणा तितकाच निर्विवाद होता. साधा स्वच्छ धुतलेला खादीचा पायजमा आणि त्यावर तसाच खादीचा कुर्ता असा त्यांचा पोशाख असायचा. विशेष म्हणजे त्यांच्या घरी डॉ. श्रीकांत चोरघडे यांच्या कारचा ते फारसा वापर करायचे नाहीत. ते जास्तीत जास्त पायीच फिरायचे. जिथे पायी जाणे शक्य नसेल तिथे मग बसने किंवा रिक्षाने जायचे. रस्त्याने झपझप पायी चालणारा त्यांचा पावणेसहा फूट उंचीचा आणि भक्कम बांध्याचा  चेहऱ्यावर विद्वत्त्तेचे तेज असलेला खादीचा पैजामा आणि कुर्ता घातलेला त्यांचा तो देह आजही माझ्या नजरेसमोर उभा राहतो.

१९७९ चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून वामनराव चोरघडे यांची निवड झाली होती. त्या संमेलनाचे वृत्त संकलन करण्यासाठी तीनही दिवस मी तिथे मुक्काम ठोकून होतो. संमेलनाच्या दिवशी सकाळी ग्रंथाती
 वेळी ग्रंथदिंडीच्या वेळी माझी आणि वामनरावांची भेट झाली. त्या दिवशी वामनराव तिथे सेलिब्रेटी होते. मात्र त्या व्यस्ततेत सुद्धा त्यांनी मी चित्रीकरण करतो आहे असे दिसताच लगेच आवाज देऊन माझी चौकशी केली होती. 

स्पष्टभक्तपणा आणि परखडपणा हे वामनराव चोरघडेंच्या व्यक्तिमत्वातील प्रकर्षाने जाणवणारे गुण होते. कुणालाही काहीही फुकट द्यायचे नाही आणि फुकट घ्यायचे देखील नाही हे त्यांचे तत्व होते. मुंबई दूरदर्शनवर त्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्याचा मानधनाचा चेक बरेच दिवस आला नव्हता. दिवस मला ते भेटले तेव्हा म्हणाले "अरे त्या तुझ्या डायरेक्टर अमृतराव शिंदेला सांग. माझा मानधनाचा चेक का पाठवत नाही." मी जरा विचारातच पडलो. त्या मानधनासाठी हे इतके अस्वस्थ का होत असावे असा प्रश्न मला पडला. लगेच त्यांनी स्पष्ट केले. 
" ते मानधन आले की मी ती रक्कम लगेच कुठेतरी देणगी म्हणून पाठवून देणार. मात्र ते माझे हक्काचे पैसे आहेत. ते मला मिळायलाच हवेत." त्यांचे हे उत्तर मला निश्चितच पटणारे होते. एकदा फोटोग्राफीच्या संदर्भातला त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यावर काहीतरी करून दे असे मला सांगितले. मी तत्काळ त्यांच्या समस्येची सोडवणूक केली. त्यांनी लगेच त्याचे पैसे किती झाले असे मला विचारले. मी त्यावर काही देऊ नका बाबा हे काय घरचंच काम आहे असे त्यांना उत्तर दिले. त्यावर ते मला म्हणाले की कुणालाही काहीही फुकट सेवा द्यायची नाही. भले तुला नको असेल तर तो पैसा कोणाला दान करून टाक, पण दुसऱ्याला काही फुकट मिळते असे वाटू देऊ नकोस. मग त्यांनी मला एक आठवण सांगितली. जमिनीत विहीर खणण्यासाठी पाणी किती खोलवर लागेल हे बघण्यासाठी एक शास्त्र आहे. ती विद्या फार थोड्या लोकांना अवगत असते. बाबांचे एक मित्र याबाबतीत जाणकार होते. त्यामुळे लोक त्यांना कुठेही विहीर खाण्याची असली की कुठे पाणी किती अंतरावर लागेल हे बघायला बोलवायचे. बाबांचे हे मित्र आर्थिक दृष्ट्या संपन्न होते. त्यामुळे ते या कामाचे पैसे घ्यायचे नाहीत. बाबांनी त्यांना सांगितले तुम्ही प्रत्येकाकडून किमान २१ रुपये तरी घेत चला. तुम्हाला ते पैसे नको असतील, पण त्याची कुणाला तरी गरज आ.हे तुम्ही ते पैसे आले की मातृसेवा संघात दान करत चला. आणि याच पद्धतीने बाबांनी त्या मित्राच्या माध्यमातून मातृसेवा संघाला बरीच मोठी रक्कम उभी करून दिली होती. हे सांगून बाबा मला म्हणाले तू देखील तिथे पैसे घ्यायचे नसतील तिथे असे दान करत जा. पण कुणालाही कोणतीही सेवा फुकट देत जाऊ नकोस. 

१९८२ मध्ये नागपूर दूरदर्शनची सुरुवात झाली. उद्घाटनाच्या दिवशी सारस्वती जन्मभू नामक एक वृत्तपट दाखवला जाणार होता. त्यात विदर्भाच्या विविध अंगावर प्रकाश टाकणारी मान्यवरांची भाषणे आणि त्यात योग्य होतील अशी चित्री करणे टाकायचे ठरले होते. आकाशानंद हे त्या वृत्तपत्राचे निर्माते होते. आकाशानंद नागपुरात आल्यावर आधी दोन दिवस आम्ही इतरत्र जाऊन चित्रीकरण केले आणि मग एक दिवस सर्व मान्यवरांच्या भाषणाचे चित्रीकरण आणि ध्वनीयंकन करायचे ठरले होते. मान्यवरांमध्ये एक वामनराव चोरघडे हे देखील होते. तिथे विदर्भाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व या विषयावर त्यांचे भाषण ठेवले होते. त्या निमित्ताने त्यांच्याकडे चर्चा करायला गेलो असताना त्यांनी मला माहीत नसलेला विदर्भाचा कितीतरी जुना इतिहास सांगितला होता. ते अगदी खुलून बोलत होते आणि मी मन लावून त्याचे श्रवण करत होतो. तो एक माझ्यासाठी अवर्णनीय आनंद ठरला होता. 

याच काळात डॉ. श्रीकांत चोरघडे यांचे अडगुलं मडगुलं या नावाने एका दैनिक वृत्तपत्रात बालकांच्या सर्वांगीण विकासावर एक दैनंदिन सदर सुरू होते. नंतर त्याचे संकलन करून पुस्तक रूपात प्रकाशित करायचे ठरले श्रीकाकांचे पुस्तक प्रकाशित होणार म्हटल्यावर आम्हा मित्रमंडळींना उत्साहाचे भरते आले होते. मात्र त्यावेळी बाबांनी सर्व सूत्रे हातात घेतली. पुस्तक प्रकाशित करायचे तर ते छापायचे कुठे इथपासून सर्व त्यांनी ठरवले. पुस्तक छापायला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा मुहूर्त करावा लागतो हे आम्हा तरुण मंडळींना त्यावेळीच कळले. मधुसूदन बनहट्टींच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये बाबा आम्हा सर्वांना सोबत घेऊन गेले आणि तिथे पुस्तकाचा नारळ फोडून त्यांनी मुहूर्त केला. मगच पुस्तकाच्या कामाला सुरुवात झाली. त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी विख्यात मराठी लेखक व. पु. काळे नागपुरात आले होते. व.पु्.काळ्यांसोबत बाबांचा झालेला संवाद देखील कानावर पडण्याचे भाग्य आम्हा मंडळींना लाभले होते. 

१९८५-८६ च्या दरम्यान केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती करण्यासाठी मी एक प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते. त्यासाठी बँकेचे कर्ज तर मंजूर झाले होते. मात्र राज्य शासनाची काही अडचणी येत होती. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे उद्योग मंत्री होते. त्यांच्याच कडे प्रकरण अडकले होते. वामनराव चोरघडे आणि सुशील कुमार शिंदे यांचे संबंध खूप चांगले आहेत असे मला कळले. त्यामुळे माझ्या कामासाठी बाबांनी शिंदेंकडे शब्द टाकावा अशी विनंती करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी पुढच्याच आठवड्यात मी मुंबईत आहे तिथे तू मला भेट. मी तुला शिंदेंकडे घेऊन चलतो आणि त्यांना सांगतो असे बाबांनी स्पष्ट केले. ठरल्याप्रमाणे मी मुंबईला पोहोचलो. फोनवर बाबांशी संपर्कात होतोच. नाना चौकात त्यांच्या मुलीकडे ते उतरले होते. त्यांनी मला मंत्रालय परिसरात साहित्य संस्कृती मंडळात भेटायला बोलावले. तिथे मी पोहोचलो तेव्हा तिथली बैठक संपत होती. तिथूनच आम्ही फोन करून शिंदे भेटीला केव्हा उपलब्ध होतील याची चौकशी केली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचे असे ठरले. तिथून मंत्रालयातून बाबा नाना चौकात जायला निघाले. मला वाटले ते टॅक्सीने जातील. तर चक्क ते बस स्टॉप कडे निघाले. मी मुंबईत बसनेच फिरतो. मला टॅक्सीवर खर्च करायला आवडत नाही, असे उत्तर त्यावेळी त्यांनी दिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाना चौकात त्यांच्या घरी पोहोचलो. तिथून आम्ही पेडर रोडला शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलो. तिथे बाहेर रिसेप्शन मध्ये वामनराव चोरघडे आले आहेत असा निरोप द्या असे आम्ही सांगितले.निरोप जाताच स्वतः सुशील कुमार शिंदे उठून बाहेर आले आणि बाबांचे स्वागत करत आम्हा दोघांनाही आत घेऊन गेले. एक मंत्री देखील वामनराव चोरघडे यांच्या साहित्याचा आणि या व्यक्तिमत्त्वाचा किती मान ठेवतो ते त्यादिवशी दिसून आले. शिंदेंनी माझा विषय समजून घेतला आणि दुसऱ्याच दिवशी मंत्रालयात मला भेटायलाही सांगितले. दुसऱ्या दिवशी भेटल्यावर शिंदेंनी लगेचच काल वामनराव चोरघडे यांनी सांगितले तेच काम ना म्हणून विचारलेही. लगेच फाईली हलायला सुरुवात झाली होती. फक्त सुशीलकुमार शिंदेच नाही तर इतर अनेक मंत्री बाबांना असेच सन्मानाने वागवताना मी बघितले होते. दत्ता मेघे मंत्री असताना अनेकदा बाबांना भेटायला त्यांच्या घरी पोहोचायचे. १९८५ मध्ये सावनेर येथे राज्य उत्कृष्ट वांग्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात बाबांच्या एका पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार होता. हे पुरस्कार वितरण त्या वेळेचे शिक्षण मंत्री सुधाकरराव नाईक यांचे हस्ते होते. बाबा जेव्हा पुरस्कार घ्यायला व्यासपीठावर पोहोचले तेव्हा सुधाकरराव नाईक यांनी व्यासपीठावरच बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले होते.

१९८८-८९ हे वामनरावांचे अमृत महोत्सवी वर्ष होते. त्या निमित्ताने चोरघडे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम करायचा ठरला. सकाळी धार्मिक कार्यक्रम आणि संध्याकाळी निमंत्रितांसह स्नेहभोजन असा तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मी देखील निमंत्रित होतो. भेटायला आलेल्या मंडळींना वामनराव स्नेहभोजनापूर्वी एक एक पेढा हातात देत होते. काहींना विशेषतः लहानांना ते पुडाची वडी देखील देत होते. योगायोगाने मला देखील त्यांनी पुडाची वडी दिली होती. 

त्यानंतर बाबांच्या भेटी जरा कमीच झाल्या. १९९० मध्ये माझ्या लग्नानंतर माझी पत्नी अनुरूपा हिला घेऊन एकदा बाबांकडे भेटायला मी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आपुलकीने तिची देखील चौकशी केली होती. 

नंतर मी देखील दुसऱ्या व्यापात जास्त झालो. दरम्यान वामनराव आता थकले आहेत, त्यांची तब्येतही ठीक नसते, असेही कानावर आले. मी त्यांना भेटायला जायचेही ठरवले होते. मात्र कामाच्या व्यस्ततेत ते राहिले. 

आणि अचानक एक दिवस वामनराव चोरघडे गेल्याचीच बातमी कळली. मी काही कामाने सकाळी अकराच्या सुमारास दुसरे एक साहित्यिक मित्र दिनकरराव देशपांडे यांच्याकडे गेलो होतो. तिथे गेल्या गेल्याच वामनराव सकाळीच गेल्याची बातमी कळली. लगेचच श्रीकांत चोरघडेंना फोन केला. दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार आहेत असे कळले. मी चारच्या सुमारासच त्यांच्याकडे पोहोचलो. थोड्याच वेळात अंत्ययात्रा सुरू झाली. साहित्य क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज त्यावेळी उपस्थित होते. 

वामनरावांचा आणि माझा जवळजवळ अठरा वर्षाचा संबंध राहिला. त्या काळातल्या अनेक चांगल्या आठवणी आज त्यांची १११ वी जयंती असल्याचे कळल्यामुळे पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. या मराठी वाङ्मय विश्वात आपल्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण करणाऱ्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाचा माझा काही काळ का होईना संपर्क राहीला हे मी माझे भाग्यच समजतो.
close