shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इतिहास घडवू शकतो तुमचं उज्ज्वल भविष्य अर्थात इतिहास विषयातील करिअरच्या विविध संधी “ डॉ. प्रकाश पांढरमिसे इतिहास विभाग प्रमुख,टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे 03.

इतिहास घडवू शकतो तुमचं उज्ज्वल भविष्य अर्थात इतिहास विषयातील करिअरच्या विविध संधी “
        डॉ. प्रकाश पांढरमिसे 
इतिहास विभाग प्रमुख,टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे 03.
इंदापूर : इतिहास केवळ भूतकाळ नसून तो भविष्यासाठी मार्गदर्शक आहे म्हणूनच ‘इतिहास घडवू शकतो तुमचे उज्वल भविष्य’ हे वाक्य केवळ शब्दांचा खेळ नाही तर त्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. इतिहास म्हणजे आपल्या समाजाचे, संस्कृतीचे राजकारण, धर्म आणि तत्वज्ञानाचे ते मूळ आहे. इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटना जरी सांगत असला तरी त्याचा उपयोग भविष्य उभं करण्यासाठी केला जातो. इतिहासाचे ज्ञान आपल्याला केवळ माहिती देत नाही तर विचार करण्याची दृष्टी, विश्लेषण करण्याची क्षमता आणि भविष्याची दिशा दाखवण्याची ऊर्जा देखील देतो. फ्रान्सिस बेक्कन या इतिहास तत्त्ववेत्याने म्हटल्याप्रमाणे “माणसाला शहाणी बनवणारी विद्या शाखा म्हणजे इतिहास होय. “ हे शहाणपण माणसाला इतिहासातून प्राप्त होते. इतिहास विषय हा केवळ मागे वळून पाहणारा नाही तर पुढे कसं जावं याचं योग्य मार्गदर्शन करणारा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक आहे.
        आजच्या माहिती विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये रोज नवनवीन बदल होत आहेत त्याचे सर्वच क्षेत्रावरती चांगले वाईट परिणाम होत आहेत. होणारे हे परिणाम जुन्यांना मागे टाकत नावीन्याचा अंगीकार करत आहेत. या जुन्या नविन गोष्टींचा मेळ घालताना कधी नविन तर कधी जुने महत्वपूर्ण वाटत आहे. इतिहास विषयातील करिअरच्या संधी या केवळ शिक्षकी पेशापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या शैक्षणिक, प्रशासकीय,साहित्यिक, सांस्कृतिक,पर्यटन, संशोधन, डिजिटल, चित्रपट,नाटक, नाणकशास्त्र,, पत्रकारिता, अभिलेखागार वस्तुसंग्रहालय, पुरातत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता( AI ) डिजिटल लायझेशन अशा विविध क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या आजच्या तरुणाईला इतिहास विषयाच्या माध्यमातून अनेक दिशा खुल्या झाल्या आहेत. त्या विविध क्षेत्रात चमकण्याची संधी देत आहेत. याच विषयाला स्पर्श करण्यासाठी “ इतिहास घडवू शकतो तुमचं उज्ज्वल भविष्य अर्थात इतिहास विषयातील करिअरच्या विविध संधी” या लेखाच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख

इतिहास विषयातील करिअरच्या विविध संधी:

शिक्षण क्षेत्रातील संधी:
                     इतिहास विषय शिकवण्याच्या अनेक संधी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. यासाठी  इतिहास विषय स्पेशल ठेऊन B.A, M.A. (History), B. Ed,NET,SET, Ph.D. यासारखी पात्रता आवश्यक असते. ती पुर्ण केल्यानंतर शिक्षक,अभ्यासक प्राध्यापक, मार्गदर्शक म्हणून अध्ययन अध्यापनाचे कार्य करू शकता येते.

 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील संधी:-
      UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास या विषयाचा फार मोठा वाटा आहे. विशेषतः General Studies मध्ये भारतीय इतिहास, स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक सुधारणांचे योगदान, यांचे महत्त्व आहे. त्यामुळे इतिहास शिकणाऱ्यांना या परीक्षांमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. या स्पर्धामध्ये उज्ज्वल यश संपादित केल्यानंतर केंद्र आणि राज्याच्या प्रशासकीय सेवांमध्ये क्लास वन, क्लास टू अधिकारी होऊन आदर्श प्रशासक होता येते. तसेच राज्य आणि केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयात इतिहासाष्टीत विभागामध्ये अधिकारी म्हणून करिअर करण्याची उत्तम संधी मिळवता येते.

 संशोधन व पुरातत्त्वशास्त्रातील संधी:-
          इतिहास विषयातील प्राचीन वस्तू, स्थापत्यशास्त्र, विश्लेषण यांचे काम करणारा तज्ञ पुरातत्त्ववेत्ता म्हणून करिअर करता येते. Archaeologist, Research Scholar, इतिहास संशोधक म्हणून करिअर करू शकतात. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), भारतीय इतिहास संशोधन परिषद (ICHR) यांसारख्या संस्थांमध्ये नोकरीच्या संधी असतात. येथे ऐतिहासिक उत्खनन, मूळ दस्तऐवजांचे विश्लेषण आणि वारसा संवर्धन यावर काम करण्याची संधी इतिहास विषयातून प्राप्त करता येते.

 संग्रहालय व अभिलेख व्यवस्थापन क्षेत्रातील संधी:-
 इतिहास विषयाशी संबंधित जुने पुरावे, दस्तऐवज,ऐतिहासिक नोंदी, हस्तलिखिते यांचे जतन आणि वर्गीकरण करण्यासाठी संग्रहालये व अभिलेखागारांत संग्रहपाल, अभिलेखपाल, इतिहासतज्ज्ञ यांची गरज असते. त्यासाठी Library Science किंवा Archival Science मध्ये विशेष शिक्षण घेऊन उत्तम करिअर करता येऊ शकते.

पर्यटन व वारसा मार्गदर्शन क्षेत्रातील संधी:-
        इतिहासाचे आणि संस्कृतीचे सखोल ज्ञान असणारे ऐतिहासिक स्थळे,गड, किल्ले, मंदिरे,पुरातन वास्तू स्थळे यांचे अभ्यासपूर्वक मार्गदर्शन हे इतिहास विषयाच्या माध्यमातून उत्तम भाषा, संवाद कौशल्ये आत्मसात करून अभ्यासक,पर्यटक मार्गदर्शक (Tour Guide), Heritage Consultant किंवा Travel Writer यासारख्या क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर संधी असते. UNESCO Heritage प्रकल्पांमध्ये अशा तज्ज्ञांची गरज असते.त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण करता येऊ शकते.

पत्रकारिता व साहित्यलेखन क्षेत्रातील संधी:-
       इतिहास विषयाचे संशोधन करून लेख,बातमी, ब्लॉग्स, डॉक्युमेंट्री, टीव्ही शो, रेडिओ कार्यक्रम, आणि पुस्तके लिहिणारे इतिहास संशोधक इतिहासकार, लेखक त्यांचे लेखन वर्तमानाशी संवाद साधणारे असते.त्यातून गतकालीन इतिहासाचा मागोवा घेतला जातो, इतिहास जागृती घडवता येते.पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार, स्तंभलेखक, संपादक म्हणून करिअर करता येऊ शकते.

 डिजिटल (Digital Humanities):क्षेत्रातील संधी:-
  आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतिहासाचे माहिती-तंत्रज्ञानाशी मिश्रण झाले आहे. Digital Archives, GIS-based Historical Mapping, Online History Portals यामध्ये इतिहासाच्या अभ्यासकांची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे या विषयात करिअर करण्याची संधी आहे.
 चित्रपट, नाटक, वेब सिरीज स्क्रिप्ट रायटर क्षेत्रातील संधी :-
       ऐतिहासिक कथा प्रसंग चरित्रे यावर आधारित स्क्रिप्ट लेखन करून चित्रपट, नाटक, वेबसिरीज यांचे स्क्रिप्ट रायटर म्हणून करिअर करता येते. तसेच ऐतिहासिक पात्रांवर आधारित नाटके,चित्ररचना, नृत्य कला सादरीकरण करता येते.
स्वयंरोजगार व स्टार्टअप्स क्षेत्रातील संधी:-
        इतिहासावर आधारित वारसा संस्कृती या अनुषंगाने ऑनलाइन क्लासेस, यूट्यूब चॅनेल्स, व्हिडिओ,लघुपट, माहितीपट,स्क्रिप्ट लेखन, रिसर्च संवाद व्हिज्युअल, वैचारिक व्याख्याने, स्थानिक वारसा प्रकल्प हे सर्व आजच्या डिजिटल युगात स्वयंरोजगाराचे माध्यम बनले आहेत.त्यातून चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. आजच्या माहितीयुगामध्ये उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहे.
          इतिहास विषयातील करिअरच्या असणाऱ्या या विविध संधी आवजच्या तरुणईच्या हाताला व डोक्याला काम देऊन एकप्रकारे समाजात बदल घडविण्याची क्षमता निर्माण करु शकतात.राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत मोलाचा वाटा निर्माण करण्यास मदत करूशकतात.वैचारिक परिपक्वता आणि सांस्कृतिक समज तरुणाई मध्ये निर्माण करू शकतात . अभ्यासूवृत्ती, सत्यशोधन आणि चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करताना तरुणाईला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्या मध्ये इतिहास विषय महत्वाचा हातभार लावू शकतो.
         इतिहास विषय हा केवळ "पुर्वी काय झाले?" यावर आधारित नसून "आता काय शिकावे?" आणि "पुढे काय घडवावे?" यावर भर देतो. म्हणूनच इतिहास विषयात वरील सांगितलेल्या करिअरच्या ज्या विविध संधी आहेत.त्या संशोधनाच्या, शिक्षणाच्या, प्रशासनाच्या, लेखनाच्या, आणि वारसा संवर्धनाच्या अगदी आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (A I) च्या क्षेत्रातील असोत.इतिहासाचा अभ्यास हा केवळ नोकरीसाठी नाही, तर एक जबाबदार, समजूतदार नागरिक घडवण्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे. यासाठी आजच्या तरुणाईने इतिहास विषय अभ्यासायला हवा व त्यातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधीच्या माध्यमातून निश्चितपणे इतिहास घडवू शकेल तुमचं उज्ज्वल भविष्य.
close