अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील वीज चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, चुलत्याच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल 91,823 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी पुतण्या राजेंद्र शांतीलाल बाफना याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रेमसुख बाफना यांच्या नावे असलेल्या मीटरमध्ये मागील बाजूस छिद्र पाडून, सिटी वायर (पिवळ्या रंगाची वायर) कट करून मीटरमध्ये फेरफार करण्यात आला. यामुळे महावितरण कंपनीच्या अंदाजे 3266 युनिट वीजेची चोरी झाली. सदर मीटरचा सध्या वापर करणारे राजेंद्र बाफना यांनी या गैरप्रकारातून वीज वापर करून कंपनीची आर्थिक फसवणूक केली.
महावितरणने केलेल्या चौकशीनंतर आरोपीवर 89,823 रुपयांचा दंड तसेच 2,000 रुपये तडजोड रक्कम असा एकूण 91,823 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, मुदतीत दंड न भरल्यामुळे अकोळनेर येथील सब स्टेशनचे इन्चार्ज अभियंता संदीप बराट यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्र. 0643, विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय प्रल्हाद गीते करीत आहेत.