जळगाव (दि. १६ ऑगस्ट २०२५) – काशीबाई ऊखाजी कोल्हे शाळेत आज सकाळी अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत भव्य रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काऊ कोल्हे शाळा ते पोलीस स्टेशन हद्दीत काढण्यात आलेल्या रॅलीत शेकडो विद्यार्थी, शिक्षकवर्ग व पोलीस प्रशासनाने उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सौ. कावेरी कमलाकर यांनी विद्यार्थिनींना महिला अत्याचार, कायदेशीर उपाययोजना व आत्मसंरक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तर पो.उपनिरीक्षक ढिकले यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, समाजावर होणारे गंभीर परिणाम तसेच कायदेशीर शिक्षा यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जागरुक राहून अशा व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये देत अमली पदार्थविरोधी संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. शनिपेठ पोलीस स्टेशनमार्फत विद्यार्थ्यांना बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या व केळी वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरुकता वाढली असून आत्मसंरक्षणाची भावना दृढ झाली आहे. पालक व शिक्षकांनी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.