प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील मांजरा काठावरील अनेक गावांमध्ये दि.१५ ऑगस्ट रोजी पहाटे जिल्ह्यातील जवळपास १७ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून याठिकाणी पिकांसह शेतीचेही नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी शेती खरडून गेलेली असून जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, बीड, तहसीलदार केज व तालुका कृषी अधिकारी केज यांना दिले आहे.
मागील चार दिवसांपासून बिड जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत असून दि.१५ ऑगस्ट रोजी पहाटे पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार केला आहे. केज तालुक्यातील युसूफवडगाव, बनसारोळा, नांदूरघाट, महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. याच बरोबर दि.१६ ऑगस्टच्या रात्रीही पावसाने हजेरी लावली असून इतर अनेक ठिकाणी सुद्धा पिके पाण्यात आहेत. तर काही ठिकाणी नदीचे पात्र ओलांडून पाणी शेतात शिरले आहे. केज तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहत असून राजेगाव, दैठणा, पिट्टीघाट,बोरगाव, भोपला, हदगाव, डोका , लाखा व शिरुरघाट या गावासह संपूर्ण मांजरा पट्ट्यातील गावे क्षतीग्रस्त झालेली आहेत. शेतीच्या नुकसानी सोबतच घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नदीपात्र ओलांडून पाणी पिकात व गावांत शिरले आहे. यामुळे पिकांचे, शेतीचे आणि रहिवाशी घरांचेही नुकसान झालेले आहे. यामुळे या भागात जिल्हा कृषी अधीक्षक बीड, तहसीलदार केज, तालुका कृषी अधिकारी केज यांनी तातडीने लक्ष द्यावे, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असून नुकसानग्रस्त भागात तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही आ. नमिता मुंदडा यांनी पत्रात म्हटले आहे.