मध्य प्रदेशातील २ साथीदारांसह विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग;पोलीसां च्या तांत्रिक तपासातून गुन्ह्याचा पर्दाफश.
जळगाव (प्रतिनिधी):फत्तेपुर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, मध्य प्रदेशातील दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
घटना कशी घडली...
दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी चेतन नंदकिशोर विसपुते (वय २६, धंदा – सोन्या-चांदीचे दुकान, रा. कापडगल्ली, जामनेर) यांनी फत्तेपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) येथील हरीओम अलंकार या दुकानात दोन अनोळखी व्यक्ती सोने खरेदीच्या बहाण्याने आले. फिर्यादीचे लक्ष विचलित करून त्यांनी ४,००,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी फत्तेपुर पो.स्टे. येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून उकल...
पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल यांच्या नेतृत्वात पथकाने घटनास्थळाचा अभ्यास करून तांत्रिक विश्लेषण केले. तपासात विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला. त्याची चौकशी केली असता त्याने मध्य प्रदेशातील आणखी दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
पुढील तपास सुरू...
सद्यस्थितीत बालकाला फत्तेपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचे साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात असून पुढील तपास फत्तेपुर पोलीस करीत आहेत.
कारवाईत सहभागी पथक...
ही कारवाई मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा.श्रीमती कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव), मा.श्री. अरुण आव्हाड (प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोउपनि. शरद बागल, पोउपनि. रविंद्र नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना/विकास सातदिवे, पोकों/प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चालक पोकों/महेश सोमवंशी (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांचा समावेश होता.