प्रतिनिधी – एरंडोल : एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी गोवरसदृश आजाराची लागण झाल्यानंतर ग्रामिण रुग्णालय, एरंडोल येथे दाखल करण्यात आले होते. गंभीर लक्षणे असलेल्या काही विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.
उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नवीन रुग्णांची नोंद झालेली नाही तसेच कुणालाही व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आजाराचा फैलाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना तात्पुरते पालकांसोबत पाठविण्यात आले आहे.
या काळात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात विद्यार्थ्यांची काळजी घेतली. संस्थेचे सचिव विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध, फळे, नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली. विद्यार्थी शाळेत परत आल्यानंतर वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार गोवर लसीकरण मोहीम आणि नियमित तपासणी राबविण्यात येणार आहे.