शिर्डी प्रतिनिधी:-
श्रीरामपूरचे मूळ रहिवासी, सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले उद्योजक व शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त प्रतापनाना भोसले यांनी नुकतीच लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला सपत्नीक भेट दिली. ही भेट त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरली असून, स्मारकाच्या जतन व ताब्याबाबतच्या महाराष्ट्र सरकारच्या यशस्वी प्रयत्नांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
या प्रसंगी आपले अनुभव सांगताना भोसले यांनी नमूद केले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या ५५ वर्षांपासून सुरू असलेली लढाई अखेर यशस्वी झाली. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक राज्य सरकारच्या ताब्यात मिळवण्यासाठी दशकानुदशके विविध प्रयत्न झाले, मात्र ते फडणवीस यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि राजकीय ताकदीमुळे शक्य झाले.
भोसले म्हणाले की, “या ऐतिहासिक निर्णयामुळे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची किर्ती आता सातासमुद्रापार महाराष्ट्रातील जनतेला प्रत्यक्ष अनुभवता येईल. हे पाऊल समाजाच्या अभिमानाचा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कार्यात दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद आहे.”
लंडनमधील स्मारकाला दिलेल्या या भेटीत भोसले दांपत्याने डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याला साष्टांग नमस्कार अर्पण केला व स्मारक जतनासाठी पुढेही योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.