वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने समाजाला पुढे नेणे ही काळाची गरज - माजीमंत्री बबनराव घोलप
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
समाजाला जोडून पुढे घेऊन जाणे हीच खरी समाजसेवा आहे. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने समाजाला पुढे नेणे ही काळाची गरज आहे. समाजाचा विकास हा सर्वांचा एकमेव उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी एकच दिशा ठरवून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.
नगर शहरातील हॉटेल पॅराडाईज येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात घोलप बोलत होते. हॉटेल पॅराडाईज येथे झालेल्या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीसे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदिले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, राज्य सचिव अनिल कानडे, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य शोभाताई कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, माणिकराव नवसुपे, युवक राज्य कार्यकारणी सदस्य कैलासराव गांगर्डे, चंद्रकांत नेटके, विठ्ठलराव जयकर, बाबासाहेब लोहकरे, रोहिदास उदमले, रामकिसन साळवे मेजर, प्रा. संजय कानडे, पोपट बोरुडे आदींसह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे घोलप म्हणाले की, वैचारिक वादाने समाजाचे नुकसान न करता विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. महासंघाच्या वतीने राज्य सरकारकडे संत रविदास विश्वविद्यापीठ स्थापन करावे, कोरोनामुळे डबघाईला आलेल्या चर्मकार व्यावसायिकांची कर्जमाफी करावी, बार्टी प्रमाणे संत रविदास रिसर्च सेंटर स्थापन व्हावे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर चर्मकार विकास महामंडळाला नियम लागू करावेत आणि संत रविदास महाराज जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच मंत्रीपदाच्या काळात समाजासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली असून, हा पॅटर्न देशभर राबविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले शिवाजी साळवे यांच्या माध्यमातून एक जबाबदार कार्यकर्ता महासंघाशी जोडला गेला आहे. त्यांनी ग्रामीण भागात समाज बांधवांना एकत्र आणत अनेक प्रश्न सोडविले आहेत. शेवटच्या घटकांना आधार देऊन पीच परवाने मिळवून दिले, कर्ज प्रकरणे मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला. हे सर्व काम गाजावाजा न करता प्रामाणिकपणे केले आहे, त्यामुळे समाजाच्या चळवळीला नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय चर्मकार महासंघात प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी साळवे यांची राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. साळवे म्हणाले की, आजपर्यंत मी समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी संघर्ष करत आलो आहे. शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शिक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न राहिला आहे. महासंघात सामील होताना माझ्या खांद्यावर अधिक मोठी जबाबदारी आली आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी निष्ठेने काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याच्या प्रारंभी संत रविदास महाराजांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक राजेंद्र बुंदिले यांनी करुन संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे व माणिकराव नवसुपे यांनी केले होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111