shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अण्णा भाऊ साठे : जनतेचा जाज्वल्य ज्वालामुखी

श्रमिकांच्या शिरीचा मुकुट, शब्दांचा तो शिलेदार,

तळपत्या वाळवंटात उगवलेला साहित्याचा सूर्यप्रहार!
कंगालांच्या काळजाचे गीत तो गात होता,
अन् पिचलेल्या पायांखाली शब्दांचे झंकार वाजत होता!


गरिबीच्या झोपडीत जन्मलेला माणूस जगण्याची शपथ,
अन्यायाच्या छायेखाली उभा सत्याचा बाण आणि शक्तीची कहाणी,
शब्दांनी क्रांती केली, लेखणीने युग बदलले,
‘फकीरा’च्या हुंकारानेच साम्राज्ये हादरले!

कष्टकऱ्याच्या ओठीचा गंध त्याच्या कवितांत होता,
भुकेल्या बाळाच्या डोळ्यांतून तोच अश्रू बनून झरत होता.
नवे गाव, नवे स्वप्न, नवे सत्य तो उभे करीत होता,
वाऱ्यावरी लेखनाची मशाल तो पेटवत होता!

साहित्यसम्राट नव्हे, तो संघर्षाचा शिल्पकार होता,
माणुसकीच्या माळेतील तो अमोल हार होता.
भाषा त्याची नव्हती गूढ, पण ज्वालामुखीसारखी होती,
ती झोपड्यांतून गर्जायची, राजवाड्यांत धडधडत पोचायची!

तो भटक्यांचा राजा, बहुजनांचा सम्राट,
नवा पंथ दाखवणारा, अंधाऱ्या दिशेतील दीपस्तंभ अगाध!
शिक्षण नसेल तरी ज्ञानाची वीण त्याच्या ओळींत होती,
शब्दाशब्दांत प्रबोधनाची मशाल पेटलेली होती!

क्रांतीचं रणशिंग तो शब्दात फुंकायचा,
अन्यायाविरुद्ध लेखणी तलवारीसारखी चालवायचा!
जात, धर्म, पंथाच्या साऱ्या भिंती ओलांडून,
माणूस म्हणून माणसाला माणसाशी जोडायचा!

तो वंचितांचा वादळ, तो दीनांचा दिवा,
तो आंधळ्याला दिशा, तो दीनाला जिवा!
अण्णा भाऊ साठे – हे केवळ नाव नव्हे, एक युग आहे,
त्याच्या आठवणींतही प्रेरणेचा झरा वाहतो आहे!

🔷 "अण्णा भाऊ" म्हणजे शब्दातील शौर्य!

🔷 "अण्णा भाऊ" म्हणजे क्रांतीचा नाद, गरिबांचा आवाज!

🔷 "अण्णा भाऊ" म्हणजे झोपडीतून उठलेला प्रकाशाचा पहिला किरण!

कवी रमेश जेठे सर 
पत्रकार, लेखक, लघुपट निर्माता

००००

close